आता ‘एआय’च्या मदतीने भटक्या कुत्र्यांचे निरीक्षण
आता ‘एआय’च्या मदतीने भटक्या कुत्र्यांचे निरीक्षण
महापालिकेचा प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : भटक्या कुत्र्यांचे निरीक्षण, त्यांच्या आरोग्याची काळजी आणि वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी महापालिका आता एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या माध्यमातून कुत्र्यांची ओळख, लसीकरण, नसबंदी यासह त्याचे बायोमेट्रिक नोंदणीही केली जाईल. या प्रायोगिक तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पावर सध्या पालिकेचे काम सुरू आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत सुरुवातीला १० हजार कुत्र्यांवर लक्ष ठेवले जाईल. विशेष म्हणजे, जर एखाद्या कुत्र्याची मानसिक स्थिती बिघडली किंवा त्याच्या वागण्यात बदल झाला, तर वेळेत पावले उचलली जातील. त्यामुळे कुत्रे चावण्याच्या घटनांना आळा बसेल. हा प्रकल्प पीपीपी मॉडेलवर राबवला जाणार असून, यामध्ये खासगी कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांची (एनजीओ) मदत घेतली जाईल. मे २०२६ पर्यंत आमचा हा प्रकल्प पूर्णपणे तयार होईल. त्यामुळे मुंबईकरांसोबतच भटक्या कुत्र्यांनाही मोठा दिलासा मिळेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
असे करणार काम
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे तंत्रज्ञान सध्या नियोजन स्तरावर आहे. १० हजार कुत्र्यांचा डेटाबेस तयार केला जात आहे. याची प्रक्रिया ठरवण्यात आली असून, सर्वप्रथम त्याची ओळख पटवली जाईल. सर्वात आधी भटक्या कुत्र्यांचे फोटो काढून ते सिस्टममध्ये अपलोड केले जातील, जेणेकरून त्यांची ओळख पटवणे सोपे होईल. त्यानंतर लसीकरण आणि नसबंदीवर भर दिला जाईल. कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी केल्यानंतर त्यांच्या शरीरावर एक विशेष सेन्सर लावला जाईल. त्यानंतर त्यांचे बायोमेट्रिक ट्रॅकिंग ठेवले जाईल. ज्याप्रमाणे आपण बायोमेट्रिक हजेरी लावतो, त्याच धर्तीवर हे सेन्सर कुत्र्यांच्या हालचाली आणि आरोग्याची माहिती यंत्रणेला देतील.
कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये वाढ
मुंबईत सध्या सुमारे ९५ हजार भटके कुत्रे आहेत. आकडेवारीनुसार, शहरात दरवर्षी २५ हजार ते ८० हजार कुत्रे चावल्याची प्रकरणे नोंदवली जातात. कुत्रे अशा प्रकारे हिंसक का होतात, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुत्र्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एका स्टार्टअप कंपनीच्या मदतीने महापालिका हे एआय मॉडेल विकसित करत आहे.

