प्रभाग क्रमांक १७२मध्ये भाजपचे वर्चस्व प्रभाग क्रमांक १७२मध्ये भाजपचे वर्चस्व
प्रभाग क्रमांक १७२मध्ये भाजपचे वर्चस्व
नागरी प्रश्नांवर लक्ष देण्याची मतदारांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : सायन कोळीवाड्यातील प्रभाग क्रमांक १७२ हा जी दक्षिण विभागातील महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रभाग मानला जातो. मुख्यतः शिव कोळीवाडा, जुना सायन परिसर आणि दाट नागरी वस्तींचा या प्रभागात समावेश होतो.
भाजपच्या राजेश्री शिरवाडकर येथील माजी नगरसेविका आहेत. असे असले तरी आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेत भाजपला आपल्या विजयाची घोडदौड कायम ठेवायची असल्यास नागरी प्रश्नांवर लक्ष देणे आवश्यक असल्याचे येथील मतदारांचे म्हणणे आहे.
या प्रभागातील लोकसंख्या संमिश्र असून, अंदाजे ४५ ते ५० हजार लोक राहतात, तर मतदारसंख्या सुमारे २५ ते ३० हजारांदरम्यान आहे. सामाजिक रचनेत मराठी समाज सुमारे ३०-३५ टक्के, मुस्लिम समाज २५-३० टक्के आणि इतर समुदाय, उत्तर भारतीय, गुजराती आणि इतर मिळून २५-३० टक्के आहेत. स्थानिक मतदारांमध्ये कोळी, आगरी, मराठा तसेच मध्यमवर्गीय नोकरदारांचा मोठा वाटा आहे.
राजकीयदृष्ट्या हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई तर सायन कोळीवाडा विधानसभेत भाजपचे तमिळ सेल्वन आमदार आहेत. मात्र सर्व निवडणुकांत येथून भाजपला चांगले मताधिक्य मिळते.
२०१७च्या महापालिका निवडणुकीत राजेश्री शिरवाडकर (भाजप) यांनी ७,१२३ मते मिळवून विजयी होऊन वॉर्डमधील नेतृत्व राखले. विरोधी उमेदवारांमध्ये काँग्रेसचे उपेंद्र दोषी यांना ५,४०० मते मिळाली तर शिवसेनेच्या प्रकाश वाघधरे यांना २,८५० मते मिळाली.
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे, की या प्रभागात सामाजिक समीकरण, उमेदवारांचा स्थानिक संपर्क, नागरी प्रश्नांवर कामगिरी आणि विरोधकांची स्पर्धा हे महत्त्वाचे ठरतील. भाजपने प्रभागातील पारंपरिक पकड आणि राजेश्री शिरवाडकर यांचा स्थानिक जनसंपर्क वापरून मतदारांमध्ये विश्वास कायम ठेवला आहे.
प्रमुख नागरी समस्या
- पावसाळ्यातील जलभराव व वाहतूक कोंडी
- जुन्या इमारती व चाळींचा रखडलेला पुनर्विकास
- अपुरा पाणीपुरवठा, गटार व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन
- पार्किंगची कमतरता व पदपथावरील अतिक्रमण
- सार्वजनिक आरोग्य सुविधांवर ताण
२०१७ चा निकाल :
- राजेश्री शिरवडकर, भाजप ः एकूण मते ७,१२३ विजयी
- उपेंद्र दोषी, काँग्रेस ः एकूण मते ५,४००
- प्रकाश वाघधरे, शिवसेना ः एकूण मते २,८५०
मूलभूत सुविधांकडे लक्ष द्या
पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही. कमी दाबाने पाणी येते आणि कचरा व्यवस्थापनही सुधारण्याची गरज आहे. केवळ पक्षाचा ठसा असून चालणार नाही. घराघरात मूलभूत सुविधा पोहोचवणाऱ्यालाच आम्ही मत देऊ, अशी प्रतिक्रिया मतदार उषा कसबे यांनी दिली.
प्रलंबित प्रश्न सोडवा
पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचते, हे चित्र वर्षानुवर्षे बदललेले नाही. डिजिटल इंडियाच्या गप्पा होतात, पण सायन कोळीवाड्यात साध्या ड्रेनेज लाईनचा प्रश्न सुटत नसेल तर ते दुर्दैवी आहे. तरुण मतदार म्हणून आम्हाला आता आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कृती हवी आहे, अशी प्रतिक्रिया किरण म्हापसेकर यांनी दिली.

