सनबर्न फेस्टीव्हलमध्ये दिल्ली, कर्नाटकचे मोबाईल चोर

सनबर्न फेस्टीव्हलमध्ये दिल्ली, कर्नाटकचे मोबाईल चोर

Published on

सनबर्न फेस्टिव्हलमध्ये दिल्ली, कर्नाटकचे मोबाईल चोर
पाच जणांना अटक, चोरलेले २३ मोबाईल हस्तगत
मुंबई, ता. २३ ः शिवडी येथे आयोजित सनबर्न फेस्टिव्हलमध्ये महागडे मोबाईल लांबविण्यासाठी चक्क दिल्ली, कर्नाटकातील सराईत चोरांच्या टोळ्या गर्दीत मिसळल्या होत्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईतून ही बाब उघड झाली.
शिवडी पोलिस ठाण्याच्या दोन पथकांनी केलेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये दिल्ली, कर्नाटकमधून आलेल्या पाच चोरट्यांना अटक करून त्यांनी चोरलेले १९ महागडे मोबाईल जप्त केले. शिवाय गुन्ह्यात वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली.
१९ ते २१ डिसेंबरदरम्यान अटल सेतूजवळील टिंबर पाँड प्लॉट येथे स्पेस बाउंड वेब लॅब प्रा.लि. कंपनीने सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल आयोजित केला होता. या फेस्टिव्हलसाठी मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील अन्य महानगरांमधून तरुणवर्ग सहभागी होतो. अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी महिला सुरक्षेसह पाकीटमारी, सोनसाखळी आणि मोबाईल चोरीस प्रतिबंधासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती. तसेच विशेष पथके तयार करून त्यांना स्वतंत्र जबाबदारी सोपवण्यात आली होती.
फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी मोबाईल चोरीच्या दोन तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. त्याआधारे नोंद गुन्ह्यांचा तपास करताना शिवडी पोलिस ठाण्याच्या दोन पथकांनी स्वतंत्र कारवायांमध्ये कर्नाटकहून खास फेस्टिव्हलमध्ये मोबाईल चोरण्यासाठी आलेल्या उडुगलप्पा दासा भोवी (२४) यास अटक केली. त्याच्याकडून चोरीचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले. अन्य कारवाईत दिल्लीहून आलेल्या शाहबाज भोले खान ऊर्फ शोएब, मोहितकुमार रामकुमार पटेल, निखिल एकनाथ यादव आणि महेशकुमार सुनेहरीलाल कुंभार या चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीचे १९ मोबाईल सापडले. या चौघांनी गुन्ह्यात वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली.

Marathi News Esakal
www.esakal.com