केंद्रीय जीएसटी अधीक्षकास अटक

केंद्रीय जीएसटी अधीक्षकास अटक

Published on

केंद्रीय जीएसटी अधीक्षकास अटक
लाचप्रकरणी सीबीआयची कारवाई

मुंबई, ता. २३ ः खासगी कंपनीच्या मालकाकडे कर प्रकरणात तडजोड करण्यासाठी १७ लाखांची लाच मागून त्यातील पाच लाखांचा हप्ता घेणाऱ्या केंद्रीय जीएसटी अधीक्षकास केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. २२) रंगेहाथ अटक केली. अंकित अगरवाल असे या अधीक्षकाचे नाव आहे.
अटकेनंतर सीबीआयने अगरवाल यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात शोधाशोध केली. सीबीआय प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, निवासस्थानी बेहिशेबी १८.३० लाख रुपये रोख आणि ४०.३१ व ३२.१० लाख रुपयांच्या मालमत्तांचे खरेदीखत सापडले. या मालमत्ता या आणि आधीच्या आर्थिक वर्षात खरेदी करण्यात आल्या आहेत. अगरवाल यांनी तक्रारदाराच्या कंपनीचे गेल्या महिन्यात लेखापरीक्षण केले. त्यात तब्बल ९८ लाख रुपयांची कर थकबाकी दाखवण्याची धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती लाचेची रक्कम १७ लाख ठरली. त्यातील पाच लाख रुपये अगरवाल यांनी २२ डिसेंबरला मागितले; मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने सीबीआयकडे धाव घेतली. सीबीआय पथकाने नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारतीतील जीएसटी कार्यालयात सापळा रचून अगरवाल यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

Marathi News Esakal
www.esakal.com