म्हाडा अंबरनाथमधील पाच भूखंड विकणार
म्हाडा अंबरनाथमधील
पाच भूखंड विकणार
आचारसंहितेनंतर निविदा; घरविक्रीला अल्प प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मुंबईबाहेर एमएमआर क्षेत्रात म्हाडाचे कोकण मंडळ मोठ्या प्रमाणात घरे उभारत असले तरी मोजक्या ठिकाणी घरांना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रतिसाद नसलेल्या, कनेक्टिव्हिटीचा अभाव असलेल्या ठिकाणच्या भूखंडाची विक्री करून महसूल उभारण्याच्या हालचाली म्हाडाने सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून म्हाडा अंबरनाथ येथील पाच भूखंडांची विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या निविदा आचारसंहितेनंतर कोकण मंडळ काढणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाचे ठाणे, कल्याण, अंबरनाथ, खोणी, शिरढोण अशा वेगवेगळ्या ठिकाणी भूखंड आहेत. परवडणारी घरे बांधली जात आहेत; मात्र अनेक ठिकाणचे भूखंड रेल्वे स्थानक किंवा मूळ शहरापासून दूर असल्याने तेथील घरांना फारशी मागणी नसते. म्हाडाचे अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून सुमारे दोन-अडीच किलोमीटर अंतरावर ८००-१००० चौरस मीटर क्षेत्रफळाचे पाच भूखंड आहेत. त्यामुळे म्हाडाने त्या ठिकाणी घरे न बांधता विक्री करून निधी उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती कोकण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
घरांच्या किमती आवाक्याबाहेर
पायाभूत सुविधा नसलेल्या ठिकाणी केवळ म्हाडाची जमीन आहे म्हणून गृहप्रकल्प उभारताना तेथे रस्ते, पाणी, सांडपाणी अशा वेगवेगळ्या सुविधा स्वखर्चाने निर्माण कराव्या लागतात. त्यामुळे तेथील घरांच्या किमती आवाक्याबाहेर जातात. हे सर्व टाळतानाच भूखंड विक्रीतून उपलब्ध होणारा निधी इतरत्र वापरून परवडणारी घरे उभारणे शक्य होऊ शकेल, असे म्हाडाचे नियाेजन आहे.

