मुंबईत ठाकरे ब्रँडची ताकद पणाला

मुंबईत ठाकरे ब्रँडची ताकद पणाला

Published on

मुंबईत ठाकरे ब्रँडची ताकद पणाला

विभागप्रमुखांचे अधिकार कापले; उमेदवारीची सूत्रे ‘मातोश्री’, ‘शिवतीर्था’वर!

मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २६ : महापालिकेच्या सत्तासंघर्षात आता ‘मातोश्री’, ‘शिवतीर्थ’ एकाच बाजूने मैदानात उतरल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. ३० डिसेंबरला शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू असताना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बंडखोरी रोखण्यासाठी राजकीय ‘सर्जिकल स्ट्राइक’ची रणनीती अवलंबली आहे.

​मुंबईतील दादर, माहीम, परळ आणि गिरगाव यांसारख्या पारंपरिक बालेकिल्ल्यांत एकाच जागेसाठी शिवसेनेच्या (ठाकरे गट) किमान पाच ते सहा इच्छुकांनी दावा ठोकला आहे. हीच स्थिती मनसेमध्येही आहे. यातून उद्‌भवणारी संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही पक्षांनी आपली ‘अधिकृत उमेदवार यादी’ जाहीर न करण्याचे ठरवले आहे. ज्या उमेदवाराचे नाव निश्चित झाले आहे, त्याला शेवटच्या क्षणी फोन करून बोलावले जाईल आणि थेट ‘एबी फॉर्म’ सुपूर्द केला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

​शिंदे गटातील ‘नाराजां’साठी दरवाजे उघडे
​उद्धव ठाकरे यांनी केवळ बचावच नव्हे तर आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रभाग क्रमांक २०० ते २२७ दरम्यानचे अनेक इच्छुक उमेदवार तिकीट न मिळाल्यास बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. यातील काही निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना आपल्याकडे खेचून त्यांना ‘मशाल’ चिन्हावर लढवण्याची चाचपणी ‘मातोश्री’ करती आहे. विशेषतः कुर्ला, अंधेरी आणि दहिसर पट्ट्यातील बंडखोरांकडे ठाकरेंचे बारीक लक्ष आहे.

​जागावाटप अंतिम टप्प्यात
​शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने जागावाटपावरून कार्यकर्त्यांमध्ये मोठी रस्सीखेच आहे. ज्या जागांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे तिथे मनसेला संधी दिल्यास किंवा मनसेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने उमेदवार उभा केल्यास स्थानिक पातळीवर नाराजी निर्माण होऊ शकते. ही नाराजी टाळण्यासाठी वरळी आणि दादरसारख्या महत्त्वाच्या जागांवर दोन्ही नेत्यांनी स्वतः लक्ष घातले आहे. ज्यांना तिकीट नाकारले जाईल, त्यांना भविष्यात महामंडळे किंवा स्वीकृत सदस्यपदाचे गाजर दाखवून शांत करण्याची रणनीती आखली गेली आहे.

​मध्यस्थांची सुट्टी; थेट ‘बॉस’चा निर्णय
​नेहमीप्रमाणे विभागप्रमुख किंवा जिल्हाप्रमुखांमार्फत एबी फॉर्म देण्याऐवजी या वेळी स्वतः ठाकरे बंधू उमेदवारांना भेटत आहेत. शिवसेनेचे एबी फॉर्म थेट ‘मातोश्री’वरून आणि मनसेचे एबी फॉर्म ‘शिवतीर्था’वरून दिले जाणार आहेत. नेत्यांमधील ‘अर्थपूर्ण’ व्यवहार आणि वशिलेबाजीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
​३० डिसेंबरच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनंतरच मुंबईच्या राजकारणात ‘गद्दारी’ झाली की ‘निष्ठा’ टिकली, याचा खरा पर्दाफाश होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com