वांद्रे गावातील ख्रिसमस उत्सवाची पंरपरा

वांद्रे गावातील ख्रिसमस उत्सवाची पंरपरा

Published on

वांद्रे गावातील ख्रिसमस उत्सवाची परंपरा
टुमदार घरे, बंगले, रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : अवघी मुंबई काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नववर्षाच्या स्वागताला सज्ज झाली आहे. वांद्रे येथील ख्रिस्तीबहुल परिसरही याला अपवाद नाही. येथील व्हेरोनिका स्ट्रीट ते वारोडा रोड परिसरातील ख्रिस्ती समाज आपली समृद्ध इतिहास, संस्कृती आणि परंपरांचा वारसा आजही जपून आहे.
या गावांमध्ये अनेक चर्च, क्रॉसेस, बेकऱ्या आणि जुनी टुमदार घरे स्थानिक समुदायाचा खरा आत्मा दर्शवतात. वांद्र्यातील रनवर गाव, पाली गाव, सेंट अँड्र्यूज रोड, माउंट मेरी रोड, सेंट पॉल रोड, माउंट कार्मेल रोड, सेंट सेबॅस्टियन रोड, चॅपल रोड ही काही ठिकाणे नाताळ, नववर्षाची उत्सुकता वाढवतात. व्हेरोनिका स्ट्रीट हा होली फॅमिली रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरात अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या ख्रिस्ती बांधव राहतात. येथील व्हिला, बंगले अथवा छोटीशी घरे बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सजवलेली घरे आणि घरावरील, बाहेरील सजावट हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. अंगणात ख्रिस्त जन्माचा देखावा,  ख्रिसमस  ट्री सजवण्याची लगबग सुरू होते. अंगणात नयनरम्य लायटिंग केली जाते. 
येथील अरुंद आणि चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये फिरताना ही टुमदार घरे आपल्याला गोव्याची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाहीत. काही बंगले हे ब्रिटिश, पोर्तुगीज काळाची आठवण करून देतात. इतकी वर्षे होऊनही ही घरं फार मोठ्या निगुतीने जपली आहेत.
व्हेरोनिका स्ट्रीटवरून पुढे आल्यावर एका चाळीच्या मोकळ्या जागेवर दिव्यांपासून बनवलेला  ख्रिसमस  ट्री आपले लक्ष वेधतो आणि सोबत चोहोबाजूंनी लावलेले चांदणीचे कंदील त्या  ख्रिसमस  ट्रीची शोभा वाढवतात. पुढे गल्लीच्या वळणावर एकमेकांकडे तोंड करून असलेल्या आणि दिव्यांनी उजळलेल्या दोन घरांमध्ये सर्वात जास्त कोणतं घर छान, सुरेख आणि आकर्षक दिसत याची स्पर्धा लावल्यासारखी भासते.
पुढच्या वळणावरील एका चिंचोळ्या गल्लीच्या तोंडावर असलेल्या घराबाहेर ख्रिस्त जन्माचा देखावा आणि कॅरल्सचे सुमधुर संगीत ऐकायला मिळते. समोरच असलेली छोटीशी क्रुसाची प्रतिमा आणि आजूबाजूने रंगीबेरंगी लायटिंग चार चांद लावतात.
बाजारातून येणाऱ्या रस्त्यावरील काही व्हिला, घरं, इमारती, सदनिकांची बाल्कनी यांवरील लायटिंगही लक्ष वेधून घेते. दिवेलागणीची वेळ ते रात्रीपर्यंत येथे भेट देण्याचा उत्तम काळ असतो. समाजमाध्यमांमुळे येथे पर्यटक दूरवरून आवर्जून भेट देतात.
आपण तिसऱ्यांदा येथे आलो असून, दरवर्षी इथे येणे आपल्याासाठी पर्वणी असल्याचे लंडनमधील ॲश्ले सांगतो.
आम्ही पिढ्यानपिढ्या येथे राहतो. रनवर सोसायटीतील सदस्य मिळून नाताळ आणि नववर्षाचे स्वागत असेच दरवर्षी उत्साहात करतो. आमची परंपरा, संस्कृती पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी मुंबईसह बाहेरून पर्यटक येत असल्याने आम्हालाही खूप आनंद होतो आणि वर्षांगणिक येणाऱ्या पर्यटकांचा उत्साह वाढत असल्याचेही शेल्डन रेमेडीज आणि त्यांच्या कन्या अँजलन आणि एडलीन सांगतात.

पोर्तुगीज शैलीची घरे
येथील अनोख्या घर पद्धतीवर पोर्तुगीज शैलीचा प्रभाव आहे. पण स्थानिक भारतीय घटकांशी जुळवून घेतलेली ही घरं प्रामुख्यानं लाकडी बांधकामाची आहेत. मंगलोर टाइल्सची छपरं, नक्षीदार लाकडी खिडक्या, रंगीत भिंती आणि बाहेरून वर जाणाऱ्या पायऱ्या या वैशिष्ट्यांमुळे ही घर वेगळी भासतात. अरुंद गल्ल्या आणि एकमेकांच्या अगदी जवळ असलेली घरं येथील सामुदायिक जीवनशैलीची साक्ष देतात.

आकर्षक सजावट
नाताळपासून सुरू होणारा हा उत्सव नववर्षापर्यंत संपूर्ण तेजात न्हालेला दिसतो. स्थानिकांसह पर्यटकांचा उत्साह, आकर्षक सजावट, येशूच्या जन्माच्या झोपड्या (क्रिब्स), ख्रिसमस ट्री आणि रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com