पोलिस भरतीत बँड्समन, सुधार सेवेसाठी सर्वाधिक स्पर्धा
पोलिस भरतीत बँड्समन, सुधार सेवेसाठी सर्वाधिक स्पर्धा
१५,००० पदांसाठी १६,५२,००० उमेदवारांचे अर्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः यंदाच्या पोलिस भरती प्रक्रियेत एका पदासाठी १०८ उमेदवार स्पर्धा करणार आहेत. विविध विभागांमधील १५ हजार ४०५ पदांसाठी १६ लाख ५२ हजार उमेदवारांनी अर्ज सादर केला असून २० जानेवारीपासून मुंबईसह राज्यात विविध केंद्रांवर मैदानी चाचणीचा टप्पा सुरू होणार आहे.
या भरती प्रक्रियेत सर्वाधिक स्पर्धा बँड्समन आणि कारागृह व सुधार सेवा या विभागांमधील रिक्त पदांसाठी करण्यात आले असून एकूण उमेदवारांमध्ये ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे.
मुंबईसह राज्य पोलिस दलातील अंमलदारांची रिक्त पदे भरण्यासाठी मुख्यालयाने भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज स्वीकृतीचा पहिला टप्पा ३० नोव्हेंबरला पूर्ण होणार होता; मात्र विशेष मागणीनुसार ही मुदत आणखी आठ दिवसांनी वाढविण्यात आली. अखेरच्या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोलिस शिपाई, चालक, बँड्समन, कारागृह आणि राज्य राखीव पोलिस बल या विभागांमधील रिक्त पदांसाठी १६ लाख ५२ हजार ८५० अर्ज मुख्यालयाकडे आले.
या अर्जांपैकी बँड्समनच्या १९ जागांसाठी १७ हजार तर कारागृहसेवेतील ५५४ पदांसाठी तीन लाख ३४ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याचे मुख्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे बँड्समनच्या एका पदासाठी ८९५ तर कारागृहसेवेतील पदासाठी ६०४ उमेदवारांमध्ये स्पर्धा असेल.
या अर्जांची छाननी करून २० जानेवारीपासून मुंबईसह राज्यातील विविध केंद्रांवर मैदानी चाचणीस सुरुवात होईल. दरम्यान, या भरती प्रक्रियेतील कॉपी, गैरप्रकार रोखण्याचे आव्हान सालाबादप्रमाणे यंदाही भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर असेल.
प्रत्येक वेळेस अद्यावत तंत्रज्ञान वापरून कॉपी आणि अन्य गैरप्रकार घडतात. गेल्या काही वर्षांत लेखी परीक्षेत इअर बड किंवा तत्सम उपकरणांच्या साहाय्याने कॉपीचे प्रकार उघड झालेत. मैदानी चाचणीत उमेदवारांचे नेमके गुण गणण्यासाठी इलेक्ट्रॉनिक चीप वापरली जाते. ती बदलून गुण वाढवण्याचे प्रकारही उघड झाले आहेत.
पदे जागा अर्ज
शिपाई १२,७०२ ७,८६,५००
चालक ४७८ १,८०,०००
बँड्समन १९ १,७०,००
कारागृह शिपाई ५५४ ३,३४,३५०
एसआरपीएफ १,६५२ ३,३५,०००

