दिव्यांग शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजाचे आदेश; शिक्षक संघटनाची नाराजी
दिव्यांग शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजाचे आदेश; शिक्षक संघटनांची नाराजी
मुंबई, ता. २७ : दिव्यांग शिक्षकांना निवडणूकसंदर्भात कोणतेही कामकाज देऊ नये, असे आदेश असताना त्यांना मुंबई महापालिकेने निवडणुकीच्या कामकाजाचे आदेश दिल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच काही शिक्षकांनी आपल्या संस्थाचालकांकडे व महापालिका प्रशासनाकडे आजारी असल्याचे कागदपत्र सादर केलेले असतानाही त्यांनाही या संदर्भातले आदेश आल्याने यावर आयोगाने तातडीने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.
मुंबई आणि परिसरातील शिक्षकांना महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत ‘बीएलओ’ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांपैकी दिव्यांग आणि आजारी शिक्षकांचा समावेश आहेत. त्यांना या निवडणूक कामकाजातून सूट द्यावी, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यांमध्येही दिव्यांग आणि आजारी असलेल्या शिक्षकांना तसेच महिला शिक्षकांना निवडणुकीचे कामे देऊ नये, अशी मागणी यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेकडून करण्यात आली होती; त्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांमध्ये काही शिक्षकांना दिलासा मिळाला असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

