मुंबईत विशेष अग्निसुरक्षा मोहीम

मुंबईत विशेष अग्निसुरक्षा मोहीम

Published on

मुंबईत विशेष अग्निसुरक्षा मोहीम
९०७ हॉटेल्स, पब, बार, क्लबची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : गोव्यात नाईट क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने थर्टी-फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हाती घेतली आहे. या अंतर्गत अग्निशमन दलाने ९०७ हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, बार, जिमखाने इत्यादींची झाडाझडती घेतली. यामध्ये १६ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्या, तर ४१ आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली.

मुंबईत हॉटेल ताज, ओबेरॉय, दिल्ली दरबार, मरीन प्लाझा अशा नामांकित हॉटेल्ससह रेस्टॉरंट, पब, बार, जिमखाने, समुद्रकिनारे, विविध सोसायटी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात थर्टी-फर्स्टच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वेळी गर्दीत दुर्घटना घडून जीवित आणि वित्तहानी होण्याची दाट शक्यता असते. त्यातच काही दिवसांपूर्वीच गोव्यात एका नाईट क्लबमध्ये अग्नितांडवामध्ये २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना पाहता आणि नववर्षनिमित्ताने आयोजित स्वागत सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, बार अशा आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षाविषयक बाबींची पूर्तता असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी कसून तपासणी केली जात आहे. ‘२२ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ९०७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १० मॉल, २५ पंचतारांकित हॉटेल, ५९ लॉजिंग-बोर्डिंग, १९ रूफ टॉप, १४८ पब, बार, क्लब, १२ पार्टी हॉल, पाच जिमखाना, ६२८ रेस्टॉरंट असे मिळून एकूण ९०७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी अग्निसुरक्षेशी संबंधित अटी व शर्तींचे पालन न करणाऱ्या ४१ आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली, तर १६ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली.

आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना
विशेष अग्निसुरक्षा मोहिमेअंतर्गत विविध आस्थापनांची तपासणी २८ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. त्यानंतरही मुंबई अग्निशमन विभागाच्या वतीने नियमितपणे कारवाई केली जाणार आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध आस्थापनांनी अग्निसुरक्षेबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. नागरिकांनीही सतर्क राहावे, असे आवाहन डॉ. अश्विनी जोशी यांनी महापालिका प्रशासनाकडून केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com