रिपब्लिकन पक्षाला हव्या १६ जागा

रिपब्लिकन पक्षाला हव्या १६ जागा

Published on

रिपब्लिकन पक्षाला हव्या १६ जागा
‘कमळा’वर निवडणूक लढवायला तयार : आठवले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २८ : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा सोडाव्यात, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. वांद्रे येथील पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते रविवारी (ता. २८) बोलत होते.

आठवले म्हणाले, की महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चेसाठी रिपब्लिकन पक्षाला सन्मानाने बोलावण्यात आले नाही, याबद्दल आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उद्या मांडणार आहोत. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसाआधी आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील, असा विश्वास आहे. रिपब्लिकन पक्षाने २६ वॉर्डांची यादी महायुतीला दिली असून, त्या २६ पैकी किमान १६ जागा मिळाव्यात, अशी मागणी पक्षाने केली आहे. १९९२मध्ये काँग्रेससोबत असताना रिपब्लिकन पक्षाचे १२ नगरसेवक निवडून आले होते आणि तेव्हा मुंबईचा महापौरही रिपब्लिकन पक्षाचा झाला होता. त्यांनी पुढे सांगितले, की आमचा पक्ष कोणासोबत जातो त्यांचा विजय होतो, हा इतिहास आहे. या वेळेसही महायुतीसोबत राहून विजय मिळवू. २०१७मध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने भाजपच्या कमळ चिन्हावर १३ जागांवर लढत दिली होती. त्यापैकी पाच जागा जिंकल्या आणि पक्षाचा उपमहापौर झाला होता. त्यामुळे मुंबईतही रिपब्लिकन पक्ष कमळ चिन्हावर उमेदवार उभे करायला तयार आहे.

रिपब्लिकन पक्षाचा सन्मान राखला जाईल : दरेकर
आठवले यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आठवले यांची भेट घेऊन रिपब्लिकन पक्षाचा सन्मान राखला जाईल, असे आश्वासन दिले. त्यांनी म्हटले, की रामदास आठवले हे महाराष्ट्रातील नव्हे, तर संपूर्ण देशातील आंबेडकरी चळवळीचे प्रमुख नेते आहेत. त्यांना सन्मानजनक जागा दिल्या जातील. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई सरचिटणीस विवेक पवार, काकासाहेब खंबाळकर, पप्पू कागदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com