मुंबईसह महाराष्ट्र अदाणींच्या 
घशात घालण्याचा डाव

मुंबईसह महाराष्ट्र अदाणींच्या घशात घालण्याचा डाव

Published on

मुंबई अदाणींच्या
घशात घालण्याचा डाव
राज ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : गेल्या १० वर्षांत अदाणी यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढली. देशातील अनेक प्रकल्प अदाणींकडे गेले. मुंबईसह महाराष्ट्र अदाणींच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी शिवाजी पार्क येथे ठाकरे बंधूंची संयुक्त सभा पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.
२०१४ पूर्वी गौतम अदाणी यांच्याकडे किती प्रकल्प होते आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आता अदाणी कुठपर्यंत पोहोचले आहेत, असे सवाल उपस्थित करीत ठाकरे यांनी अदाणी यांच्या देशभरातील प्रकल्पांची यादीच दाखवली. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत त्यांचे प्रकल्प वाढत आहेत. मुंबईतही त्यांना आणखी विविध प्रकल्पांसाठी जमीन हवी आहे; मात्र मुंबई महापालिकेच्या परवानगीशिवाय तसे करता येत नाही, म्हणून भाजपला मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायची आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
आम्ही २० वर्षांनंतर युती करीत आहे. त्यामुळे अनेकांना उमेदवारी देता आली नाही. अनेक जण नाराज झाले. आमच्याही हाती काही गोष्टी नसतात; मात्र त्यांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. तरीही जे नाराज झाले असतील त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही हे शहर उत्तम करू शकतो, पण तुम्ही आमच्याबरोबर आलात तर हे शक्य आहे. त्यामुळे आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा. आजची निवडणूक ही मराठी माणसांसाठी शेवटची निवडणूक आहे, असाही इशारा ठाकरे यांनी दिला.
---
सत्ताधाऱ्यांचा माज उतरवायचाय!
भाजपने अकोटमध्ये एमआयएमबरोबर, तर बदलापूरमध्ये काँग्रेसबरोबर युती केली. त्यांचे ६६ उमेदवार बिनविरोध निवडून आले. तुळजापूरमध्ये ड्रग्ज रॅकेटमधील व्यक्तीला उमेदवारी दिली. बदलापूरमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक केले. सत्ताधाऱ्यांचा हा उद्दामपणा, माज उतरवायचा आहे. कुठेही दुबार मतदार दिसला, तर तिथल्या तिथे फोडून काढा, सतर्क राहा, असेही आवाहन ठाकरे यांनी केले.

Marathi News Esakal
www.esakal.com