तंत्रज्ञानाधारित प्रचाराची चढाओढ
तंत्रज्ञानाधारित प्रचाराची चढाओढ
एआय- रोबोट- रील्सचे डिजिटल युद्ध
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीने प्रचाराच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. रस्त्यांवरील सभा, बॅनर आणि पोस्टरच्या चौकटीत अडकलेला प्रचार आता थेट मोबाईल स्क्रीनवर उतरला आहे. एआय, रोबोट आणि सिनेमा-प्रेरित डिजिटल कॅम्पेनमुळे पालिका रणसंग्राम अधिक रंगतदार आणि तंत्रज्ञानाधिष्ठित झाला आहे.
भाजपने ‘मार्व्हल’च्या धर्तीवर साकारलेल्या डिजिटल कॅम्पेनने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवली आहे. सुपरहीरोच्या अवतारात दाखवलेले उमेदवार, जलद कट्स, थरारक पार्श्वसंगीत आणि विकासकामांची आक्रमक मांडणी असलेले व्हिडिओ विशेषतः तरुण मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. हे व्हिडिओ केवळ पाहिले जात नाहीत, तर मोठ्या प्रमाणावर शेअरही होत आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांनी प्रचारासाठी थेट रोबोट मैदानात उतरवले आहेत. काही प्रभागांत प्रचारफेरीत फिरणाऱ्या या रोबोटवर पक्षाचे पोस्टर आणि डिजिटल संदेश झळकत आहेत. रस्त्यावर चालणाऱ्या या रोबोटकडे पाहण्यासाठी मतदार थांबत असून, त्यांच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करत आहेत, त्यामुळे हा प्रचार आपोआपच व्हायरल होत आहे.
‘एआय’चा वापर
यंदाच्या निवडणुकीत एआयचा वापरही निर्णायक ठरत आहे. मतदारांचा कल, परिसरातील प्रमुख प्रश्न, तसेच वयोगटानुसार संदेश तयार करण्यासाठी एआयचा आधार घेतला जात आहे. व्हिडिओ, ऑडिओ संदेश आणि डिजिटल पोस्टर्समुळे प्रचार अधिक नेमका आणि परिणामकारक होत असल्याचे चित्र आहे. पालिका निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येत असताना मुंबईत राजकीय संघर्षासोबतच डिजिटल युद्धही तीव्र होत आहे. कोणाचा प्रचार अधिक क्रिएटिव्ह ठरणार आणि कोणाची डिजिटल रणनीती मतदारांच्या मनावर ठसा उमटवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय रील्सचा धडाका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे या दोन्ही पक्षांनी प्रचारासाठी गाण्यांचा प्रभावी वापर सुरू केला आहे. पक्षीय गाणी, मराठी ढोल-ताशांचा ठेका आणि लोकप्रिय बीट्सवर तयार केलेल्या रील्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. कार्यकर्ते, तरुण समर्थक आणि काही ठिकाणी स्थानिक कलाकारही या रील्समध्ये सहभागी होत असून, प्रचाराला उत्सवी रंग चढताना दिसत आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर या रील्सना हजारो लाइक्स आणि शेअर्स मिळत असून, डिजिटल माध्यमातून थेट तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तरुणाईचा ट्रोल-टच प्रचार
पालिका निवडणुकीत यंदा तरुण वर्गाने प्रचाराची वेगळीच वाट धरली आहे. इन्स्टाग्राम रील्स, मीम्स आणि हलक्याफुलक्या व्हिडिओंमधून राजकारणावर विनोदी टोले लगावले जात आहेत. गाण्यांच्या तालावर तयार केलेल्या रील्स, लोकप्रिय डायलॉग्स आणि दैनंदिन मुंबईकरांच्या अनुभवांवर आधारित कंटेंट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भाषणांपेक्षा हशा, पोस्टरपेक्षा मीम्स आणि सभांऐवजी रील्स असा प्रचाराचा नवा फॉर्म्युला तरुणाईने स्वीकारला आहे. शेअर, कमेंट आणि रिमिक्सच्या माध्यमातून हा प्रचार आपोआप पुढे जात असून, डिजिटल रणसंग्रामात तरुण मतदार निर्णायक ठरत असल्याचे चित्र आहे.
यंदाच्या निवडणुकीत काय नवे?
१. प्रचाराची रणांगणे आता चौकात नाही, तर मोबाईल स्क्रीनवर
२. सुपरहीरो अवतार, रोबोट फेरी आणि एआय मेसेजिंगचा थेट वापर
३. तरुण मतदार केंद्रस्थानी; रील्स, शॉर्ट व्हिडिओंवर भर
४. प्रचार पाहणारेच नाही, तर शेअर करणारे मतदारही महत्त्वाचे
५. पालिका निवडणूक म्हणजे राजकीय लढाईसोबत डिजिटल युद्ध
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

