नवमतदारांकडे सत्तेच्या चाव्या

नवमतदारांकडे सत्तेच्या चाव्या

Published on

नवमतदारांकडे सत्तेच्या चाव्या
घोषणांपेक्षा व्हिजन महत्त्वाचे; १५ लाख तरुणांचा कौल ठरणार निर्णायक
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : महानगरपालिकेच्या रणांगणात यावेळेस केवळ राजकीय दिग्गजच नाही, तर एक कोटींहून अधिक मतदारांची शक्ती कोणाच्या पारड्यात जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांचा कल निकालाचे चित्र पूर्णपणे बदलू शकतो. यात सुमारे १५ लाख नवतरुण मतदारांचे मतदान निर्णायक ठरणार आहे.
मुंबईच्या एकूण लोकसंख्येपैकी १८ ते २९ वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, यावेळेस सुमारे १२ ते १५ टक्के म्हणजे सुमारे १५ लाख ५० हजार मतदार हे पहिल्‍यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये विजय-पराजयाचे अंतर हे केवळ ५०० ते २,००० मतांचे असते. अशावेळी नवीन नोंदणी झालेले तरुण मतदार ज्या उमेदवाराला साथ देतील, तोच नगरसेवक म्हणून निवडून येईल. त्‍यामुळे सर्वच मतदार आपल्या प्रभागातील नवतरुण मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या नवतरुण मतदारांचे आपले एक व्हिजन आहे. ते आता पारंपरिक पद्धतीने विचार न करता निवडणुकीतील नेहमीचे प्रश्‍न पाणी, गटार यापलीकडे विचार करत आहेत. पारंपरिक मराठी अस्मिता किंवा धर्म, यांसारख्या भावनिक मुद्द्यांपेक्षा तरुण पिढी पायाभूत सुविधा, हवामान बदल आणि डिजिटल पारदर्शकतेवर भर देत आहेत.

तरुणाई का महत्त्वाची?
तरुण मतदार हा सामाजिक माध्यमांवर सक्रिय असल्याने ते नगरसेवकाला त्यांच्या कामाचा जाब विचारण्यात मागे राहत नाहीत. स्टार्ट-अप संस्कृतीत वाढलेली ही पिढी महापालिकेच्या कामातही ‘स्मार्ट’ उपाय शोधते. मुंबईतील मतदानाचा टक्का ५५ टक्क्यांच्या आसपास रेंगाळतो. हा टक्का ६० टक्के पार नेण्याची ताकद केवळ नवमतदारांमध्ये आहे, असे राजकीय तज्ज्ञ मानतात.
मुंबईच्या सत्तेच्या चाव्या यावेळेस केवळ घोषणांवर नाही, तर एक कोटी मतदारांच्या विवेकावर अवलंबून आहेत. ‘जनरेशन झेड’ म्हणजेच ‘जेन झी’ या प्रक्रियेत सक्रिय झाल्यामुळे ही निवडणूक अधिक रंजक झाली आहे. नवमतदारांची मते ज्यांच्या पारड्यात पडतील, त्यांचा वारू विजयाच्या दिशेने झेपावेल, असे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे.

फक्त रस्ते आणि नाले दुरुस्तीच्या पलीकडे जाऊन मुंबईला ‘ग्लोबल सिटी’ म्हणून विकसित व्हायला हवं. सध्याचे राजकारण पाहून कधीकधी गोंधळ उडतो. आपण मतदान केलं नाही तर आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार उरत नाही. म्हणूनच मी माझ्या मताने बदलाची सुरुवात करणार आहे.
श्रुष्‍टी कदम, नवतरुण मतदार

मुंबईत एक कोटींहून अधिक मतदार असून, मतदान केवळ ५० ते ५५ टक्के होते. ही टक्केवारी वाढवण्यासाठी आम्ही तरुण पुढे येत आहोत. मला असा नगरसेवक हवाय, जो डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभागातील समस्या सोडवेल.
- अनुष्का वर्पे, नवतरुण मतदार

५५ लाख पुरुष आणि ४८ लाख महिला मतदारांमध्ये आम्ही तरुण घटक खूप महत्त्वाचे आहोत. आमचा प्रभाव केवळ एका मतापुरता मर्यादित नाही, तर आम्ही आमच्या घरातील मोठ्यांनाही योग्य उमेदवार निवडण्यासाठी प्रवृत्त करत आहोत.
- प्रशिक साळवी, नवतरुण मतदार

निवडणुकीचा अर्थ केवळ सुट्टी नसून तो शहराचा पोत बदलण्याचा दिवस आहे. एक कोटी मतदारांमध्ये माझा एक मतही मौल्यवान आहे. मला विकासाचा ‘मुंबई मॉडेल’ हवा आहे, जिथे शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य असेल.
- व्यंकटेश अप्पीरेड्डीपल्ली, नवतरुण मतदार

निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईतील मतदारांची संख्या खालीलप्रमाणे
* एकूण मतदार- १,०३,४४,३१५
* पुरुष मतदार- ५५,१६,७०७
* महिला मतदार- ४८,२६,५०९
* अन्य -१,०९९
* जेन झी - सुमारे १५. ५० लाख
* एकूण जागा- प्रभाग २२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com