सामाजिक माध्यमांवर ‘वार-पलटवार’

सामाजिक माध्यमांवर ‘वार-पलटवार’

Published on

सामाजिक माध्यमांवर ‘वार-पलटवार’
राजकीय व्हिडिओंनी इंटरनेटवर धुमाकूळ
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १३ : महापालिका निवडणुकीसाठी प्रत्यक्ष प्रचाराची मुदत संपली असून, मैदानातील तोफा आता थंडावल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष सभा आणि रॅली बंद झाल्या असल्या तरी, प्रचाराचा खरा रणसंग्राम आता सामाजिक माध्यमांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित झाला आहे.
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांना उघडे पाडणाऱ्या व्हिडिओंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून, मुंबईचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
​निवडणूक आचारसंहितेनुसार जाहीर प्रचार बंद झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा व्हॉट्सॲप, फेसबुक आणि एक्सकडे वळवला आहे. यामध्ये प्रामुख्याने पैसे वाटपाचे आरोप असलेले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत. अमक्‍या उमेदवाराने पैसे वाटले, असा दावा करणारे व्हिडिओ समोर येत असतानाच, दुसऱ्या बाजूने ते व्हिडिओ जुने किंवा बनावट असल्याचे सांगून प्रतिवाद केला जात आहे. ​या सर्व प्रकारामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सुरू असलेले हे ‘व्हिडिओ युद्ध’ मतदानावर किती परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

​रात्रीच्या गुप्त बैठका
​केवळ पैसेवाटपच नव्हे, तर रात्रीच्या अंधारात होणाऱ्या गुप्त बैठकांचे व्हिडिओदेखील समोर येत आहेत. मतदारांना प्रभावित करण्यासाठी किंवा विशिष्ट समाजाची मते वळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या या हालचाली कॅमेऱ्यात कैद करून त्या व्हायरल केल्या जात आहेत. यामध्ये काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळत आहे.

​प्रशासनाची डोकेदुखी वाढली
​निवडणूक आयोगाने जाहीर प्रचारावर बंदी घातलेली असताना, समाजमाध्यमांवरून सुरू असलेल्या या छुप्या प्रचारामुळे प्रशासकीय यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. उमेदवारांचे समर्थक एकमेकांच्या विरोधातील जुन्या क्लिप्स, वादग्रस्त विधाने आणि ‘स्टिंग ऑपरेशन्स’चा वापर करून मतदारांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

बाहेरील उमेदवारांना मतदारांचा विरोध
या निवडणुकीत अनेक पक्षांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्या प्रभागातील किंवा बाहेरील उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. अशा उमेदवारांना लक्ष्य करणारे अनेक उपरोधिक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आमच्या प्रभागाचा प्रश्न स्थानिकच सोडवू शकतो, उपऱ्याला थारा नाही, अशा आशयाचे संदेश आणि संबंधित उमेदवाराला त्यांच्या स्वतःच्या प्रभागातील समस्यांची माहिती नसल्याचे दाखवणारे व्हिडिओ विरोधकांकडून पसरवले जात आहेत. त्‍यामुळे बाहेरून आलेल्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली असून, स्थानिक विरुद्ध बाहेरील असा नवा संघर्ष आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर रंगताना दिसत आहे.

......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com