विरोधी सत्तेत ३० वर्षांनी बदल

विरोधी सत्तेत ३० वर्षांनी बदल

Published on

विरोधी सत्तेत ३० वर्षांनी बदल
काँग्रेसचे पद जाणार; ठाकरे संघर्षासाठी सज्ज
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २० : मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांनी मुंबईच्या राजकारणाला एक नवे आणि ऐतिहासिक वळण दिले आहे. तब्बल तीन दशकांनंतर आता मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा (ठाकरे) सत्तेत नाही, तर विरोधी पक्षनेते म्हणून डरकाळी फोडताना दिसणार आहे, तर दुसऱ्या बाजूला महायुतीला मिळालेल्या बहुमतामुळे काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे विरोधी पक्षनेते पद आता संपुष्टात येणार असून, शिवसेना (ठाकरे) अधिकृतपणे मुख्य विरोधी पक्षाची धुरा सांभाळणार आहे.
भाजप विरोधी राजकारणाचा केंद्रबिंदू गेल्या २० वर्षांपासून काँग्रेसकडे असलेले विरोधी पक्षनेते पद आता अधिकृतपणे गेल्यामुळे, मुंबईतील भाजप विरोधी राजकारणाचा केंद्रबिंदू आता पूर्णपणे ‘मातोश्री’ असणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सभागृहात आता केवळ ‘हो ला हो’ चालणार नाही. ६५ नगरसेवकांसह शिवसेना (ठाकरे) महायुतीला प्रत्येक नागरी मुद्द्यावर जाब विचारायला सज्ज आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते पद गेल्याने आता भाजप विरूद्ध ठाकरे असा थेट सामना मुंबईकरांना पाहायला मिळेल.

​तब्बल ३० वर्षांनंतर पुनरावृत्ती
​मुंबई महापालिकेच्या इतिहासात शिवसेना विरोधी बाकावर असणे ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे. १९८५ पासून मुंबईवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. यापूर्वी १९९२ मध्ये जेव्हा काँग्रेसने सत्ता मिळवली होती, तेव्हा शिवसेना मुख्य विरोधी पक्ष ठरली होती. त्या वेळी १९९२ ते १९९७ या काळात मिलिंद वैद्य यांनी शिवसेनेचे पहिले विरोधी पक्षनेते म्हणून कार्यभार सांभाळला होता. योगायोगाने, २०२६ च्या या निवडणुकीतही मिलिंद वैद्य यांनी आपला विजय कायम राखला असून, पुन्हा एकदा त्यांच्याच नावाची विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चा सुरू झाली आहे.

​काँग्रेसची पीछेहाट, ठाकरेंची मुसंडी
​गेल्या अनेक निवडणुकांपासून मुंबई महापालिकेत काँग्रेस हाच मुख्य विरोधी पक्ष राहिला आहे. राजहंस सिंह (२००२-२०१२) आणि रवी राजा (२०१७-२०२२) यांसारख्या नेत्यांनी हे पद भूषवले. मात्र, २०२६ च्या निकालात काँग्रेस अवघ्या २४ जागांवर मर्यादित राहिल्याने त्यांचे हे पद आता हिरावले गेले आहे. ६५ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरलेला शिवसेना (ठाकरे) हा गट आता अधिकृत विरोधी पक्ष असेल.

हे आहेत प्रमुख दावेदार
​मिलिंद वैद्य : १९९२ चा अनुभव आणि दांडगा जनसंपर्क
​विठ्ठल लोकरे : सलग ५ वेळा निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक
​किशोरी पेडणेकर : माजी महापौर आणि आक्रमक चेहरा

यांनी गाजवले विरोधी बाक
कालावधी /विरोधी पक्षनेता /पक्ष
१९९७ - २००२ राजहंस सिंह / काँग्रेस
२००२-२०१२ /राजहंस सिंह /काँग्रेस
२०१२-२०१७ /ज्ञानराज निकम-प्रवीण छेडा /काँग्रेस
२०१७-२०२२ /रवी राजा /काँग्रेस

ठाकरे विरूद्ध महायुती थेट संघर्ष
​भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीने ११८ जागांसह बहुमत मिळवले असले तरी, ६५ जागांसह उद्धव ठाकरे यांचा गट सभागृहात अत्यंत आक्रमक राहण्याची चिन्हे आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्प, कोस्टल रोड आणि मुंबईच्या विकसक धार्जिण्या धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी ठाकरे गटाने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

ठाकरेंसाठी १९९२ ची पुनरावृत्ती का महत्त्वाची?
* ​मिलिंद वैद्य कनेक्शन : १९९२ मध्ये मिलिंद वैद्य यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसला सळो की पळो करून सोडले होते. २०२६ मध्ये पुन्हा एकदा तेच निवडून आले असून, त्यांच्याकडे या पदाचा प्रदीर्घ अनुभव आहे.
* आक्रमक राजकारण : सत्तेत असताना शिवसेनेची भाषा प्रशासकीय होती, पण आता विरोधी बाकावर आल्यामुळे मराठी अस्मिता आणि मुंबईची लूट या मुद्द्यांवरून ठाकरे गट पुन्हा रस्त्यावरच्या संघर्षासाठी सज्ज झाला आहे.
* स्थानिक भूमिपुत्र : मिलिंद वैद्य हे कोळी समाजाचे असून, भूमिपूत्र आहेत. त्यामुळे केवळ मुंबईकर किंवा मराठी नाही, तर मुंबईकर मराठी भूमिपुत्र अशी त्यांची ओळख अधिक प्रभावी ठरवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com