एसटीच्या अधिकृत हॉटेल मोटेल चालकांची मुजोरी कायम

एसटीच्या अधिकृत हॉटेल मोटेल चालकांची मुजोरी कायम

Published on

एसटी थांब्यावरील हॉटेलचालकांची मुजोरी
पाणी, नाश्ताचे दर जास्तच; प्रवाशांच्या तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : एसटी महामंडळाकडून आपल्या अधिकृत बस थांब्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी अवघ्या ३० रुपयांमध्ये चहा-नाश्ता देण्यात येतो. मात्र, काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर हॉटेल-मोटेल थांबा येथून एसटीला मिळणारे उत्पन्न एक वेळ बुडाले तरी चालेल, परंतु प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते. मात्र, तरीही हॉटेलचालकांची मुजोरी कायम आहे. त्यामुळे आता पुन्हा एसटीचे अधिकारी तपासणी करणार आहेत.
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा-नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्याबाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून, प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, खाद्य शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेलवरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एसटी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे, अशा प्रकारच्या तक्रारी उद्भवत आहेत. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी या वेळी दिले होते.
एसटी महामंडळाच्या नियमानुसार, एसटीच्या प्रवाशांसाठी करण्यात आलेल्या करारानुसार खासगी हॉटेलमध्ये शिरा, पोहे, उपमा, वडा पाव, इडली आदींपैकी एक पदार्थ आणि चहा असा नाश्ता ३० रुपयांना द्यावा लागणार आहे, तर ‘नाथजल’ या मिनरल वॉटरच्या बाटलीसाठी १५ रुपये आकारण्यात येत आहेत. यामध्ये विक्रेत्याने कुलिंग चार्ज अथवा इतर कारणाने छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारू नये, असे आदेश महामंडळाने दिले आहेत. मात्र, त्याचे पालन केले जात नाही.

अहमदनगरवरून मुंबईला येणारी बस लोणावळा फूड प्लाझा येथे निशिसागर हॉटेलजवळ थांबविण्यात आली होती. बाहेरगावचे प्रवासी असल्याने ते जास्त भाव करू शकत नाहीत. तसेच जवळ असलेल्या हॉटेलमध्ये थोडाफार नाश्ता करून बसमध्ये बसण्याची घाई असते. याचा गैरफायदा हॉटेलचालक उचलतात. खरेतर त्यांनी प्रवाशांना सवलतीत नाश्ता देणे आवश्यक आहे. मात्र, अधिकचे पैसे वसूल केले जातात.
- सुभाष येवले, प्रवासी

पुन्हा तपासणी करणार
अहमदनगरवरून मुंबईला येणारी बस लोणावळा फूड प्लाझा येथे निशिसागर हॉटेलजवळ थांबली. या वेळी प्रवाशांच्या तक्रारी आल्यानंतर गेल्या वर्षी दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. एकदा पाच हजार रुपये दंड आणि दुसऱ्यांदा १० हजारांचा दंड आकारला होता. आता पुन्हा तपासणी करण्यात येईल, असे एसटीच्या मुंबई विभागाचे निरीक्षक महेश जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com