वाहतूककोंडीसह गैरसोयींना पूर्णविराम

वाहतूककोंडीसह गैरसोयींना पूर्णविराम

Published on

वाहतूक कोंडीसह गैरसोयींना पूर्णविराम
सुविधांनी सुसज्ज वांद्रे पूर्वेतील स्कायवॉकला पादचाऱ्यांची पसंती
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : वांद्रे पूर्व स्थानकाबाहेरील स्कायवॉकअभावी गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेली नागरिकांची परवड अखेर थांबली आहे. स्कायवॉक पाडल्यामुळे या परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांमुळे प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
नागरिकांची हीच परवड विचारात घेऊन उच्च न्यायालयाने यंत्रणांना धारेवर धरून स्कायवॉक पुनर्बांधणीसाठी मुदत दिली होती. त्याचाच परिणाम म्हणून काही दिवसांपूर्वी हा स्कायवॉक नागरिकांसाठी खुला झाला असून, पाच वर्षे सुरू असलेल्या नागरिकांच्या गैरसोयीला पूर्णविराम मिळाला आहे.
मुंबईतील पहिला स्कायवॉक अशी ओळख असलेला वांद्रे पूर्व स्कायवॉक एमएमआरडीएने २००८ मध्ये उभारला. पुढे दुरवस्थेमुळे तो पाडण्यात आला, परंतु स्कायवॉकच्या वाढत्या मागणीमुळे पालिकेने सुरुवातीला वांद्रे न्यायालयापर्यंत ४५० मीटर लांब आणि चार मीटर रुंद स्कायवॉक उभारण्याची योजना आखली होती. मात्र, पुढे त्याची लांबी ६८० मीटरपर्यंत वाढवण्यात आली. हा स्कायवॉक प्रशस्त आहे. त्यावर दोन ठिकाणी सरकते जिने आहेत. शिवाय तीन ठिकाणी अतिरिक्त जिने असून, त्यासोबतच मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पालिका स्कायवॉकचा विस्तार बीकेसीच्या दिशेने सुमारे १०० मीटरने करण्याचा विचारात आहे, स्कायवॉक खुला झाल्यापासून दररोज सुमारे ९०,००० ते ९५,००० पादचाऱ्यांची ये-जा नोंदवली असून, सकाळी ८ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते ९ या गर्दीच्या वेळेत गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
उन्हाळा आणि पावसाळ्यात येथून मार्ग काढणे महिला प्रवाशांसाठी कठीण होत असे, स्कायवॉक सुरू झाल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. स्कायवॉक प्रशस्त आहे. हवा खेळती आहे, अशी प्रतिक्रिया प्रिया गायकवाड यांनी दिली.

न्यायालयीन लढा
वांद्रे स्थानक (पूर्व) बाहेरील अरुंद, निमुळता रस्ता, फुटलेली गटारे, सांडपाणी, बेस्ट बसेस, खासगी वाहने आणि रिक्षाचालकांची मुजोरी यामुळे पादचाऱ्यांना त्यातून मार्ग काढण्यासाठी दररोज कसरत करावी लागते. शासकीय, निम-शासकीय, खासगी अशी अनेक कार्यालये येथे असल्यामुळे हजारो, नागरिक रस्त्यावरून चालत कार्यालय गाठत होते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही नित्याचीच होती. समस्येवर योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी करणारी याचिका माजी न्यायिक अधिकारी आणि वकली के. पी. पी, नायर यांनी केली होती. पुनर्बांधणीतील सुस्त कारभारामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याबाबत उच्च न्यायालयाने पालिकेची कानउघाडणी केल्यानंतर या स्कायवॉकची पुनर्बांधणी करून न्यायालयीन आदेशांची परिपूर्ती करण्यात आली आणि मागील पाच वर्षांपासून नागरिकांची होणारी गैरसोय अखेर दूर झाली आहे.

लोकांना होणारा त्रास पाहवत नसे, न्यायालयात वारंवार केलेला पाठपुरावा आणि प्रयत्नांना यश आल्याचे समाधान आहे. स्कायवॉक तयार झाल्याने आनंद आहे.
- के. पी. नायर, याचिकाकर्ते (न्यायीक अधिकारी)

भिकारी गर्दुल्ल्यांना आवरा
स्कायवॉक सुरू होऊन आठवडा उलटला नाही, तर इथे भिकारी, गर्दुल्ल्यांचा वावर सुरू झाला आहे. ठिकठिकाणी पान, तंबाखूची पिंक दिसत असून, जवळील झोपडपट्टीतील मुले येथे खेळण्यास विशेषतः सरकत्या जिन्यांचा वापर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे यांना वेळीच आवरण्याची गरज काहीनी बोलून दाखवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com