आजार समजून घेण्यासाठी नवी पद्धती  केईएम रुग्णालयात ६७ रुग्णशिक्षणपटांची निर्मिती शताब्दी वर्षानिमित्त आरोग्य जनजागृतीचा अभिनव उपक्रम

आजार समजून घेण्यासाठी नवी पद्धती केईएम रुग्णालयात ६७ रुग्णशिक्षणपटांची निर्मिती शताब्दी वर्षानिमित्त आरोग्य जनजागृतीचा अभिनव उपक्रम

Published on

केईएम रुग्णालयात ६७ रुग्णशिक्षण लघुपटांची निर्मिती
शताब्दी वर्षानिमित्त आरोग्य जनजागृतीचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : पांढऱ्या कोटातील डॉक्टर, गजबजलेले वॉर्ड, ओपीडीतील रुग्णांची गर्दी आणि त्याच वातावरणात कॅमेरे, लाइट्स व ‘ॲक्शन’चा आवाज. चित्रपटाच्या सेटसारखे भासणारे हे दृश्य प्रत्यक्षात मुंबईतील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयाचे आहे. उपचारांसोबतच जनजागृतीवर भर देत केईएम रुग्णालयाने आपल्या शताब्दी वर्षानिमित्त ६७ रुग्णशिक्षण लघुपटांची निर्मिती करून आरोग्य शिक्षणाच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.
‘उपचारांपूर्वी आजार समजून घेणे गरजेचे आहे’ या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात सर्वसामान्य रुग्णांना आजाराची माहिती सोप्या आणि परिणामकारक पद्धतीने मिळावी, हा मुख्य उद्देश आहे. विविध सामान्य आजारांवर आधारित हे लघुपट रुग्णांना लक्षणे, तपासण्या, उपचार प्रक्रिया आणि बरे होण्याचा संपूर्ण प्रवास समजावून सांगतात. हा संपूर्ण उपक्रम अरुणा अडवाणी यांच्या देणगीतून साकार झाला आहे. या संकल्पनेला केईएम रुग्णालयाच्या डीन डॉ. संगीता रावत यांचे सतत मार्गदर्शन आणि पाठबळ लाभले आहे. रुग्ण, नातेवाईक आणि समाजामध्ये आजारांविषयी योग्य माहिती देऊन भीती कमी करणे, उपचारांवरील विश्वास वाढवणे आणि आरोग्यविषयक सजगता निर्माण करणे या उद्देशाने केईएम रुग्णालयाचा हा शताब्दी उपक्रम निश्चितच समाजासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

१७ विभागांतील आजारांवर आधारित चित्रपट

न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी, स्त्रीरोग, बालरोग, शस्त्रक्रिया, त्वचारोग, नेत्ररोग, फिजिओथेरपी, ईएनटी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी यांसह एकूण १७ विभागांतील आजारांवर हे रुग्णशिक्षणपट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक चित्रपटात रुग्णाची तक्रार घेऊन रुग्णालयात येण्यापासून ते उपचारानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यापर्यंतचा प्रवास वास्तवदर्शी पद्धतीने मांडण्यात आला आहे. ओपीडी आणि आयपीडीतील उपचार प्रक्रिया, आवश्यक तपासण्या, उपचारपद्धती आणि पुढील काळजी यांचा समावेश या चित्रपटांत असून, हे सर्व चित्रपट हिंदी भाषेत तयार करण्यात आले आहेत, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल.

डॉक्टरच कलाकार, रुग्णालयच सेट
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व चित्रपटांमध्ये केईएम रुग्णालयातील डॉक्टर, विद्यार्थी, परिचारिका, तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांनीच अभिनय केला आहे. चित्रीकरण संपूर्णपणे केईएम कॅम्पसमध्येच करण्यात आले असून, सर्व चित्रपटांच्या पटकथा केईएमच्या डॉक्टरांनीच लिहिल्या आहेत. या प्रकल्पासाठी प्रसिद्ध चित्रपटकार सुभाष घई यांच्या ‘व्हिसलिंग वुड्स’ संस्थेचे सहकार्य लाभले आहे. व्हिसलिंग वुड्सचे दिग्दर्शक विशाल मंगलोरकर आणि अनुराधा यांच्या सर्जनशील योगदानामुळे हे चित्रपट अधिक प्रभावी ठरले आहेत.

ओपीडी वेटिंग एरियामध्ये थेट प्रक्षेपण
हे रुग्णशिक्षण लघुपट केईएम रुग्णालयाच्या यूट्युब, इन्स्टाग्राम आणि अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयातील विविध ओपीडी वेटिंग एरियामधील टीव्हींवर हे चित्रपट सतत दाखवले जात आहेत, जेणेकरून रुग्णांना प्रतीक्षेच्या वेळेतच आजाराविषयी माहिती मिळू शकेल. याशिवाय, प्रत्येक चित्रपटासाठी क्यूआर कोड तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, रुग्णालयाबाहेर असतानाही रुग्ण आणि नातेवाईक हे चित्रपट पाहू शकणार आहेत.


केईएम रुग्णालयाला १०० वर्षे पूर्ण झाली असून, या शताब्दी वर्षात १०० रुग्णशिक्षण लघुपटांची निर्मिती करण्याचा आमचा संकल्प आहे. आजार, प्रतिबंधात्मक उपाय आणि घ्यावयाची काळजी या सर्व बाबी या लघुपटांमधून मांडण्यात आल्या आहेत.
डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

Marathi News Esakal
www.esakal.com