कामा रुग्णालयात सीएसएसडी युनिट सुरू होणार
कामा रुग्णालयात सीएसएसडी युनिट सुरू होणार
निर्जंतुकीकरणाचा मार्ग मोकळा, संसर्गाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : कामा रुग्णालयात लवकरच केंद्रीय निर्जंतुकीकरण व पुरवठा विभाग अर्थात सीएसएसडी (सेंट्रल स्टेराइल सप्लाय डिपार्टमेंट- सीएसएसडी) युनिट सुरू होणार आहे. या युनिटमुळे शस्त्रक्रिया तसेच विविध वैद्यकीय उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचे केंद्रीकृत पद्धतीने स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि वितरण केले जाणार असून, रुग्णालयातील संसर्गाचा धोका कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.
सध्या रुग्णालयातील विविध विभागांमध्ये उपकरणांचे निर्जंतुकीकरण स्वतंत्रपणे केले जाते. यामुळे प्रक्रियेत विसंगती निर्माण होण्याची तसेच वेळ आणि मनुष्यबळ अधिक लागण्याची शक्यता असते. सीएसएसडी युनिट सुरू झाल्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया एका केंद्रीत आणि मानक पद्धतीने पार पडेल. त्यामुळे उपचारांची गुणवत्ता वाढण्यासोबतच शस्त्रक्रियांच्या सुरक्षिततेतही लक्षणीय सुधारणा होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
या युनिटमध्ये अत्याधुनिक निर्जंतुकीकरण यंत्रणा, ऑटोमेटेड वॉशिंग सिस्टीम आणि योग्य साठवणूक सुविधा असणार आहेत. त्यामुळे उपकरणांचे आयुष्य वाढेल आणि देखभाल-दुरुस्तीवरील खर्च कमी होईल.
सीएसएसडी युनिटमुळे रुग्णांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी होईल. तसेच मनुष्यबळ कमी लागेल आणि मेंटेनन्सचा खर्चही कमी येईल.
- डॉ. तुषार पालवे,
वैद्यकीय अधीक्षक, अल्ब्लेस अँड कामा रुग्णालय
युनिटचा फायदा
* कामा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर, वॉर्ड, प्रसूती कक्ष, आयसीयू, ओपीडी अशा सर्व विभागांसाठी लागणारी उपकरणे स्वच्छ व निर्जंतुक करून पुरवली जातील. त्यामुळे रुग्णांना सुरक्षित उपचार मिळतील आणि संसर्गाचा धोका कमी होईल.
* कामा रुग्णालय हे मुंबईतील महत्त्वाचे महिला व मातृरोग रुग्णालय आहे. येथे संसर्ग कमी झाला, शस्त्रक्रिया सुरक्षित झाल्या आणि उपचारांची गुणवत्ता वाढली, तर त्याचा परिणाम शहरातील इतर रुग्णालयांवरही होतो. कारण गंभीर रुग्णांचे रेफरल, भारवाटप आणि उपचारांची साखळी एकमेकांशी जोडलेली असते.
* सध्या सीएसएसडी युनिट प्रामुख्याने कामा रुग्णालयासाठीच मात्र भविष्यात धोरण ठरवल्यास, जवळच्या लहान रुग्णालयांना किंवा प्रसूतिगृहांनादेखील या युनिटमधून निर्जंतुक साहित्य पुरवठा करता येऊ शकतो. तत्काळ आणि थेट फायदा कामा रुग्णालयातील रुग्णांना व कर्मचाऱ्यांना होणार आहे, तर दीर्घकालीन आणि अप्रत्यक्ष फायदा संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मिळू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

