युवकांच्या नेतृत्वातून शिक्षण व आरोग्यावर राष्ट्रीय संवाद : ६ वी राष्ट्रीय बालपरिषद यशस्वी
बालनेतृत्वातून शिक्षण-आरोग्यावर राष्ट्रीय मंथन
सलाम मुंबई फाउंडेशनचा पुढाकार, १० राज्यांतील विद्यार्थ्यांचा ऑनलाइन सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : सलाम मुंबई फाउंडेशनच्या पुढाकारातून सहावी राष्ट्रीय बालपरिषद (ऑनलाइन) गुरुवारी (ता. ६) यशस्वीपणे पार पडली. ‘सुदृढ आणि सक्षम भारतासाठी युवकांचे नेतृत्व’ या संकल्पनेवर आधारित ही परिषद समाजमाध्यमांद्वारे आयोजित करण्यात आली होती. परिषदेत महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या १० राज्यांमधील ग्रामीण व दुर्गम भागातील किशोरवयीन विद्यार्थी, शिक्षक, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि शासकीय प्रतिनिधी सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बालपरिषदेत एकूण १,६१,००० विद्यार्थी व भागधारकांनी सहभाग नोंदवला.
परिषदेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. प्राची राठी (राष्ट्रीय सल्लागार, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, भारत सरकार), डॉ. सुमन नेगी (सहयोगी प्राध्यापक, केंद्रीय शिक्षण विभागाशी संलग्न- नीपा) आणि प्रीती चौधरी (प्रादेशिक संचालक, अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण) पश्चिम विभाग) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ही राष्ट्रीय बालपरिषद तंबाखू नियंत्रण, पोषण, मानसिक आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित शालेय वातावरण आणि जीवनकौशल्ये या महत्त्वाच्या विषयांवर केंद्रित होती. किशोरवयीन विद्यार्थ्यांना या विषयांवर आपले विचार मांडण्याची संधी देणे आणि शाळा व समुदाय पातळीवर सकारात्मक वर्तनात्मक बदल घडवून आणणे, हा परिषदेचा मुख्य उद्देश होता.
-----------
५०,९६५ शाळा तंबाखूमुक्त घोषित
सलाम मुंबई फाउंडेशन २००७ पासून शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विषयांवर कार्यरत आहे. ‘तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले’ हा कार्यक्रम सध्या महाराष्ट्रातील ३४ ग्रामीण जिल्ह्यांतील एक लाख १० हजार ३०० शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. देशातील १० राज्यांमधील दोन लाख १८ हजार ४१९ शिक्षक व ६०३ सेवाभावी संस्था या उपक्रमाशी संलग्न असून, ५० हजार ९६५ शाळा तंबाखूमुक्त घोषित झाल्या आहेत.
----------
परिषदेदरम्यान विविध राज्यांतील बाल नेतृत्वांनी शाळा व समुदाय स्तरावर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण मांडणीतून आरोग्य व शिक्षण विषयांवरील जागरूकता स्पष्टपणे दिसून आली. ६ वी राष्ट्रीय बालपरिषद ही शिक्षण व आरोग्य यातील समन्वय अधिक बळकट करणारी आणि युवकांच्या नेतृत्वातून राष्ट्रीय संवाद घडवून आणणारी महत्त्वपूर्ण पायरी ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

