पावसाळ्याआधीच डासांवर घाव!

पावसाळ्याआधीच डासांवर घाव!

Published on

पावसाळ्याआधीच डासांवर घाव!
२४ वॉर्डांमध्ये महापालिकेची तीन महिन्यांची विशेष मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पावसाळ्यात शहरात पसरणाऱ्या डेंगी आणि मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेचा कीटकनाशक विभाग सज्ज झाला आहे. यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विभागाने एक विशेष कृती आराखडा तयार केला आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबईतील २४ वॉर्डांमध्ये डासांच्या अळ्या नष्ट करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
​डेंगीचा प्रसार करणाऱ्या एडिस इजिप्ती जातीच्या डासांची उत्पत्ती प्रामुख्याने साठवून ठेवलेल्या भंगार सामानात, जुन्या टायर्समध्ये आणि अडगळीच्या ठिकाणी होत असते. ही बाब लक्षात घेऊन कीटकनाशक विभागाने मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचा विशेष कार्यक्रम आखला आहे. प्रत्येक महिन्यातील दोन दिवस पूर्णपणे एडिस डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या मोहिमेसाठी विभागातील जास्तीत जास्त कर्मचारी आणि मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे.
​मागील दोन-तीन वर्षांतील आकडेवारीचा अभ्यास केला असता, अडगळीच्या झोपडपट्ट्या आणि काही सरकारी मालमत्तांच्या परिसरात डासांची उत्पत्ती अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. या हॉटस्पॉटचा अभ्यास करून पावसाळ्यापूर्वी शंभर टक्के उत्पत्ती स्थळे नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गरज भासल्यास ही मोहीम जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू ठेवली जाईल.
केवळ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करून ही मोहीम थांबणार नाही, तर त्यानंतर घरांतर्गत कीटकनाशक फवारणी केली जाणार आहे. त्‍यामुळे अळ्या आणि डासांचा नायनाट होण्यास मदत होईल.

या विभागातून सुरुवात
​​कीटकनाशक विभागाच्या निरीक्षणानुसार, मुंबईतील ई (भायखळा) आणि एफ-दक्षिण (परळ-शिवडी) या विभागांमध्ये डेंगी, मलेरियाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आढळला आहे. येथील जुन्या चाळी, दाट लोकवस्ती आणि इमारतींची रचना यामुळे डासांना पोषक वातावरण मिळते. त्यामुळेच यंदाच्या मोहिमेची सुरुवात प्रामुख्याने याच विभागांतून केली जाणार आहे.

कीटकनाशक विभागाचे आवाहन
डेंगीसाठी कारणीभूत असणारे एडिस आणि मलेरिया पसरवणारे ॲनोफिलीस या दोन्ही जातींच्या डासांची उत्पत्ती रोखणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरात पाणी साचणार नाही आणि भंगार साठणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन कीटकनाशक विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com