घुसखोरांना निवारा, रोजगार देणाऱ्यांवरही कारवाई

घुसखोरांना निवारा, रोजगार देणाऱ्यांवरही कारवाई

Published on

घुसखोरांना निवारा, रोजगार देणाऱ्यांवरही कारवाई
भारतीय ओळख देणारे रडारवर; २०२५मध्ये सर्वाधिक १,०५८ घुसखोरांना बांगलादेशात धाडले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबई पोलिसांनी घुसखोरांची विशेषतः अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची धरपकड आक्रमकरीत्या हाती घेतली असून, त्यांना निवारा तसेच रोजगार उपलब्ध करून देणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे भविष्यात जागा भाड्याने देण्यापासून रोजगार देतानाही संबंधित व्यक्ती बांगलादेशी नाही ना, याची खातरजमा मालकवर्गास करावी लागणार आहे.
पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांची सीमा ओलांडून भारतात येणे तुलनेने सहज शक्य आहे. पश्चिम बंगालमध्ये पाय ठेवताच बांगलादेशी घुसखोरांना पासपोर्ट, शिधापत्रिका, शाळेचा दाखला, आधार, पॅन कार्ड अशी बनावट कागदपत्रे उपलब्ध होतात. ती सोबत घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी हे घुसखोर प्रामुख्याने मुंबईच्या दिशेने वाटचाल करतात. मुंबई महानगर प्रदेश परराज्यातील भारतीयांप्रमाणे घुसखोर बांगलादेशींनाही सामावून घेतो.
हे घुसखोर घरगड्यापासून देहविक्री व्यवसायापर्यंत सर्वत्र रोजगाराच्या संधी साधतात. गेल्यावर्षी घडलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांतील पोलिस यंत्रणेस परकीय घुसखोरांना तातडीने त्यांच्या देशात घडण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यानंतर अन्य पोलिस यंत्रणांप्रमाणे मुंबई पोलिसांनीही धडक कारवाई हाती घेतली.

शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात स्थापित दहशतवादविरोधी कक्षाकडे प्राधान्याने बांगलादेशी घुसखोरांची धरपकड करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासोबत गुन्हे शाखेलाही घुसखोरांची माहिती मिळविण्याच्या दृष्टिकोनातून स्रोत बळकट करण्याच्या सूचना आयुक्तालयाने दिल्या आहेत.
मुंबई पोलिसांनी २०२५मध्ये तब्बल १,०५८ घुसखोरांना बांगलादेशात धाडले. पूर्वीही बांगलादेशसह अन्य देशांतील घुसखोरांवर कारवाई होत होती. मात्र घुसखोरांना अटक करून त्यांच्यावर खटला चाले. खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाचा निकाल येईपर्यंत सरासरी पाच वर्षे निघून जात. तोवर जामीन मिळवून घुसखोर कारागृहाबाहेर येत. बाहेर येताच नवी ओळख धारण करून अन्य शहरात किंवा अन्य राज्यांत निघून जात. शिवाय न्यायालयाने संबंधित आरोपी घुसखोर आहे, असा निकाल दिला तरच संबंधितांना बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू होत असे. मात्र ऑपरेशन सिंदूरनंतर गृह विभागाने खटल्याची प्रक्रिया वगळून थेट प्रत्यार्पण करण्याची मुभा पोलिस यंत्रणांना दिली. ताब्यात घेतलेली व्यक्ती बांगलादेशी नागरिक आहे याची खात्री होताच तिला तातडीने सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) ताब्यात दिले जाते. देशातील अन्य राज्यांतून ताब्यात आलेल्या घुसखोरांना बीएसएफ तुकड्या तुकड्यांमध्ये बांगलादेशच्या सीमेवर तेथील यंत्रणांच्या ताब्यात देते.

२०२५मध्ये प्रत्यार्पणाचे प्रमाण चौपटीने वाढले
या वेगवान प्रत्यार्पण प्रक्रियेमुळे २०२२ ते २०२४ या तीन वर्षांच्या तुलनेत २०२५मध्ये प्रत्यार्पणाचे प्रमाण चौपटीने वाढले. मुंबई पोलिसांनी घुसखोरांना ताब्यात घेण्यासोबत त्यांना भारतीय नागरिक असल्याचे बनावट पुरावे मिळवून देणारे, निवासी किंवा व्यावसायिक गाळे भाड्याने देणारे आणि हाताला काम देणाऱ्यांवर धडक कारवाया सुरू केल्या आहेत. निवासी किंवा व्यावसायिक गाळे भाड्याने घेणारे कोण याची काटेकोर तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. गाळा भाड्याने देताच भाडेकरूचे तपशील स्थानिक पोलिस ठाण्यास प्रत्यक्ष येऊन किंवा ऑनलाइन स्वरूपात देणे मुंबई पोलिसांनी बंधनकारक केले आहे. हे आदेश न मानणाऱ्या मालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई आरंभली आहे.

अलीकडे केलेल्‍या कारवाया
- गेल्या महिन्यात आरसीएफ पोलिसांनी नवी मुंबई येथे कारवाई करून बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. त्यातील एक महिला तुर्भे येथील डान्सबारमध्ये नर्तिका म्हणून काम करीत होती. पोलिसांनी बांगलादेशी महिलेस रोजगार आणि निवास व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या बारमालकास बेड्या ठोकल्या.

- गेल्याच आठवड्यात दिंडोशी पोलिसांनी विरार येथून सुजल दयाळ या व्यक्तीस अटक केली. बांगलादेशी घुसखोरांना बनावट शिधापत्रिका आणि अन्य आवश्यक कागदपत्रे पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सुजलच्या निवासस्थानी शोधाशोध केली तेव्हा पोलिसांना तब्बल ३५० बनावट शिधापत्रिका सापडल्या. त्यावरून त्याने गेल्या काही कालावधीत शेकडो बांगलादेशी घुसखोरांना भारतीय ओळख दिल्याचा संशय आहे.

आकडेवारी
वर्ष प्रत्यार्पण
२०२२ २१
२०२३ ६७
२०२४ १६४
२०२५ १,०५८

घुसखोरांना त्वरित त्यांच्या देशात धाडणे शक्य
मुंबई पोलिस दलातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्‍या माहितीनुसार, घुसखोरांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या देशात पाठवणे ही नियमित सुरू राहणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक पोलिस ठाणे प्राधान्याने घुसखोरांची ओळख पटवून कारवाई करते आहे. केंद्र शासनाच्या नव्या आदेशामुळे घुसखोरांना त्वरित त्यांच्या देशात धाडणे शक्य होत आहे. बांगलादेश शासनाने जारी केलेले ओळखपत्र, येथील अधिकृत आयएमओ पोर्टलद्वारे ताब्यात घेतल्याची ओळख लगेच पटते. शिवाय त्यांचे बँक व्यवहार तपासले जातात. भारतीय ओळख धारण करण्यासाठी मिळवलेल्या शासकीय दस्तांची खातरजमा करून लगोलग घुसखोरांना बीएसएफच्या ताब्यात दिले जाते, असे त्‍यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com