युटीएस बंद; विरारमध्ये प्रवासी महिला-टीसी वादाचा व्हिडिओ व्हायरल

युटीएस बंद; विरारमध्ये प्रवासी महिला-टीसी वादाचा व्हिडिओ व्हायरल
Published on

यूटीएस बंद; विरारमध्ये प्रवासी महिला-टीसी वादाचा व्हिडिओ व्हायरल
नव्या ‘रेलवन’ ॲपची माहिती नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : रेल्वे प्रशासनाने १ मार्चपासून यूटीएस ॲपवरील अनारक्षित तिकीट आणि पास बुकिंग सेवा बंद केली आहे. मात्र, या बदलाची माहिती अनेक प्रवाशांपर्यंत अद्याप पोहोचलेली नसल्याने स्थानकांवर तिकीट तपासणीदरम्यान वादाचे प्रकार घडत असल्याचे दिसत आहे. विरार स्थानकावर तिकीट तपासणीदरम्यान एका प्रवासी महिला आणि तिकीट तपासणी अधिकाऱ्यामध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार स्थानकात तिकीट तपासणी सुरू असताना एका महिलेने मोबाईलवरील तिकीट दाखविल्याचा दावा केला. मात्र, दुसऱ्या तिकीट तपासणी अधिकाऱ्याने पुन्हा तिकीट दाखवण्याची मागणी केल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित महिला, “मी आधीच तिकीट दाखवले आहे. जर यूटीएस ॲप चालत नसेल, तर त्यात माझी काय चूक, प्रत्येक टीसीला पुन्हा पुन्हा तिकीट दाखवत बसायचे का आणि या प्रक्रियेमुळे ट्रेन सुटली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार,” असा सवाल करताना दिसते. या वेळी रेल्वे पोलिस आणि तिकीट तपासणी अधिकारी महिलेला तिकीट दाखवण्याची विनंती करत असल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. यूटीएस ॲपवरील सेवा बंद झाल्याची माहिती नसल्याने अनेक प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे या घटनेतून समोर आले आहे.

‘रेलवन’ ॲपचा वापर करण्याचे आवाहन
रेल्वे मंत्रालयाने १ मार्चपासून यूटीएस ॲपवरील पास बुकिंग व अनारक्षित तिकीट सेवा बंद करून त्या सुविधा नव्या ‘रेलवन’ ॲपमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. यूटीएस ॲप २७ डिसेंबर २०१४ रोजी सुरू करण्यात आले होते. या ॲपद्वारे प्रवाशांना अनारक्षित तिकीट, मासिक पास आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुक करता येत होते. आता या सर्व सेवा ‘रेलवन’ ॲपमध्ये एकत्रितपणे उपलब्ध करण्यात आल्या असून, प्रवाशांनी नव्या ॲपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com