शासन सेवा आता नागरिकांच्या दारी

शासन सेवा आता नागरिकांच्या दारी

Published on

शासन सेवा आता नागरिकांच्या दारी
‘महाराजस्व अभियान’ शिबिराला महापौर रितू तावडे यांची भेट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : शासनाच्या विविध सेवा नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि जलद पद्धतीने त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत घाटकोपर येथे विशेष महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत कुर्ला तहसीलदार कार्यालयाच्या वतीने घाटकोपरमधील उपाश्रया लेन येथील शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळेत हे शिबिर पार पडले.
या वेळी मार्गदर्शन करताना महापौर रितू तावडे म्हणाल्या, “शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविणे हीच खरी लोकाभिमुख प्रशासनाची ओळख आहे. महाराजस्व अभियानामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होत असून, त्यांच्या दैनंदिन प्रशासकीय अडचणी दूर होण्यास मोठी मदत होत आहे. महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे प्रशासन अधिक गतिमान झाले आहे.”
महापौरांनी या वेळी ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांसाठी कागदपत्र पडताळणी व केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिबिरात स्वतंत्र दालन सुरू करण्याची सूचना केली.
शिबिरात उत्पन्न, रहिवास, जात व नॉन-क्रीमीलेयर दाखले, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आदींसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजना यांसारख्या कल्याणकारी योजनांसाठी अर्ज स्वीकारण्याचीही सोय करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला नगरसेवक राखी जाधव, निर्मिती कानडे, धर्मेश गिरी यांच्यासह महसूल विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या अर्जांची पडताळणी करून प्रलंबित प्रकरणांतील त्रुटी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
स्थानिक नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. एकाच छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने घाटकोपरवासीयांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com