रत्नागिरीत ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’
रत्नागिरीत ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’
मुंबई विद्यापीठास २.५ कोटी मंजूर; कोकणात स्टार्टअपना बळ
मुंबई, ता. २० : केंद्र सरकारच्या अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रासाठी ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी २.५ काेटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून काेकणातील युवक, शेतकरी, मत्स्य व्यावसायिक आणि स्थानिक उद्योजकांच्या स्टार्टअप उपक्रमांना बळ मिळणार आहे.
कोकणपट्ट्याला स्वयंपूर्ण उद्योजक केंद्र म्हणून विकसित करण्याचा मुंबई विद्यापीठाचा मानस आहे. स्थानिक पातळीवरील फळप्रक्रिया कचरा, सागरी वाहतूक यांचे रूपांतर व्यावसायिक संधींमध्ये करून ‘आत्मनिर्भर कोकण’ साकारण्याचा उद्देश निश्चित करण्यात आला आहे.
रत्नागिरी उपकेंद्रात सुमारे चार हजार चौरस फूट जागेत अत्याधुनिक ‘फॅब लॅब’सह इन्क्युबेशन सुविधा उभारण्यात येणार आहे. स्टार्टअप्ससाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रोटोटायपिंग, तसेच निधी उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक परिसंस्था निर्माण केली जाणार आहे. मुंबईतील तज्ज्ञ व उद्योग क्षेत्राशी थेट जोडणीही साधली जाणार आहे.
१८० किलाेमीटरपेक्षा अधिक किनारपट्टी असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात ‘ब्ल्यू इकॉनॉमी’साठी मोठी क्षमता असून, येथील विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, महिला बचत गटांसाठी ब्रँडिंग व मार्केटिंग सहाय्य, तसेच युवकांसाठी थ्री-डी प्रिंटर, लेझर कटर, सीएनसी यंत्रसामग्रीसारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर उपलब्ध होणार आहे.
कोट-
‘मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ हा उपक्रम कोकणातील नवोपक्रम, कौशल्यविकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल. हे सेंटर कोकणातील युवकांसाठी स्वप्नांना उभारी देणारे व्यासपीठ ठरेल. या उपक्रमातून पुढील पाच वर्षांत ६०पेक्षा अधिक स्टार्टअप्सना चालना देऊन हजारो रोजगारनिर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

