

हवाई सुंदरीसह गुंतवणूकदारांची फसवणूक
भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः वर्षाला २४० टक्के परतावा देणार आणि दरमहा १० टक्के मुद्दल परत करणार, असे प्रलोभन दाखवत अग्रगण्य विमान कंपनीच्या हवाई सुंदरीसह १३ गुंतवणूकदारांना ४३ लाख रुपयांना फसवणाऱ्या भांडुप येथील गार्गी एंटरप्रायझेस या बोगस कंपनीसह मालक, संचालकांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी भांडुप येथे कार्यालय भाड्याने घेत बोगस कंपनी थाटली होती. कंपनीचे मालक राजेंद्र साठे, दलाल सुनील भांबर्डेकर आणि प्रदीप मौर्या यांनी गुंतवणुकीवर दरमहा २० टक्के नफा आणि १० टक्के मुद्दल परतावा अशी ३० टक्के रक्कम देतो, असे प्रलोभन गुंतवणूकदारांना दाखवले. यातील प्रमुख आरोपी साठे तक्रारदार तरुणीच्या परिचयातील आहे. त्यामुळे या तरुणीने विश्वास ठेवत १० लाख रुपये गुंतवले; मात्र परतावा न मिळाल्याने तरुणीने साठेकडे चौकशी केली. सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याने पैसे बुडणार नाहीत, अशी हमी त्याने दिली. सोबत १० लाख रुपयांचा धनादेश दिला. तो बाऊन्स झाल्याने तरुणीने भांडुप पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
या तरुणीने केलेल्या चौकशीत आरोपींनी अन्य १२ गुंतवणूकदारांना ३३ लाख रुपयांना फसवल्याचे समजले. या सर्वांच्या वतीने तरुणीने तक्रार दिली. त्या आधारे गुन्हा नोंदविण्यात आल्याचे भांडुप पोलिसांकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.