वाढवण बंदर विकासासाठी हापॅग-लॉयडचा गुंतवणूक करार
वाढवण बंदर विकासासाठी
हापॅग-लॉयडचा गुंतवणूक करार
मुंबई, ता. २३ : राज्यातील वाढवण बंदराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हापॅग-लॉयड कंपनी मोठी गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भातील करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
सागरी सहकार्य दृढ करण्यासाठी तसेच भारताच्या नौका वाहतूक क्षेत्राच्या विकासाला पाठबळ देण्यासाठी हापॅग-लॉयड कंपनी सहाय्य करणार आहे. त्यासंदर्भातील इरादा पत्रावर कंपनीच्या तसेच केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या. कंपनीचे मुख्य अधिकारी रोल्फ जानसेन आणि भारताचे बंदर, जहाज बांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या भेटीदरम्यान मुंबईत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या करारामध्ये जहाजांची भारतीय ध्वजाअंतर्गत पुनर्नोंदणी, जहाज पुनर्वापर क्षमता विकास आणि वाढवण बंदरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी धोरणात्मक सहकार्य आदी मुद्दे आहेत. भारताची सागरी क्षमता वाढवणे, जागतिक व्यापार प्रवास जोडणी वाढवणे आणि पर्यावरणपूरक नौका वाहतुकीला चालना देणे या बाबींना पाठिंबा द्यायचा आहे, असे कंपनीचे सीईओ रोल्फ जानसेन म्हणाले.
यानुसार जेएनपीटीच्या सहकार्याने उभारले जाणारे वाढवण बंदर विकसित करण्याबाबत धोरणात्मक आराखड्यावरही चर्चा केली जाईल. वाढवण बंदर देशातील सागरी वाहतूक क्षेत्र अजून सक्षम करेल. त्यामुळे हापॅग-लॉयड कंपनी या विकासाला पाठबळ देण्यासाठी आपले जागतिक शिपिंग आणि बंदर क्षेत्रातील कौशल्य प्रदान करेल, असेही त्यांनी सांगितले. मुदत संपलेली जहाजे पर्यावरणाचे निकष पाळून सुरक्षितरीत्या फेरवापरात आणली जातील. यासाठी भारतातील जहाज पुनर्वापर क्षमता युरोपच्या मानकांनुसार विकसित केली जाईल. या यंत्रणेद्वारे दरवर्षी १०० जहाजांचा पुनर्वापर केला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

