भविष्यातील डॉक्टर घडवण्यासाठी वैद्यकीय शिक्षणात आमूलाग्र बदलांची गरज

भविष्यातील डॉक्टर घडवण्यासाठी वैद्यकीय शिक्षणात आमूलाग्र बदलांची गरज
Published on

वैद्यकीय शिक्षणात बदलाची गरज
नव्या डॉक्टरांना तंत्रज्ञानस्नेही बनवण्यावर भर

भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : भविष्यातील आरोग्य व्यवस्थेला सक्षमपणे तोंड देण्यासाठी डॉक्टर अधिक तंत्रज्ञानस्नेही, बहुआयामी आणि कौशल्यसंपन्न असणे अत्यावश्यक बनले आहे. ताज्या संशोधनानुसार सध्याच्या वैद्यकीय शिक्षण पद्धतीत तातडीने बदल करण्याची गरज असून, विशेषतः महामारी व्यवस्थापन, मानसिक आरोग्य आणि प्रिसिजन मेडिसिन (जनुकाधारित उपचार) या क्षेत्रांवर अधिक भर देणे आवश्यक आहे.

डॉ. पथियिल रवि शंकर, डॉ. अविनाश सुपे आणि डॉ. रानो मल पिर्यानी यांच्या अभ्यासात जागतिक आरोग्य व्यवस्थेतील बदलत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणातील उणिवा अधोरेखित करण्यात आल्या आहेत. ‘आर्काइव्ह्‍ज ऑफ मेडिसिन अँड हेल्थ सायन्सेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनात अधिक व्यावहारिक आणि व्यापक शिक्षणपद्धतीची गरज व्यक्त करण्यात आली आहे. वाढती लोकसंख्या, पर्यावरणीय बदल, संसर्गजन्य रोगांचा धोका आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्याचवेळी रुग्ण अधिक जागरूक झाले असून, उपचार प्रक्रियेत सक्रिय सहभागाची अपेक्षा वाढली आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे वैद्यकीय ज्ञानासोबत प्रभावी संवादकौशल्य, तांत्रिक समज आणि टीमवर्कची क्षमता असणेही आवश्यक ठरत आहे.

कोविड-१९ महामारीने आरोग्य व्यवस्थेतील अनेक त्रुटी स्पष्ट केल्या. या पार्श्वभूमीवर भविष्यातील संकटांना सामोरे जाण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमात महामारी व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण आणि आपत्कालीन प्रतिसाद यांचा समावेश करणे अत्यावश्यक असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. ‘वन हेल्थ’ दृष्टिकोन स्वीकारत मानव, प्राणी आणि पर्यावरण यांचा एकत्रित विचार करणेही गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.

याशिवाय वैद्यकीय विद्यार्थ्यांमधील ताण, नैराश्य आणि मानसिक थकवा ही गंभीर समस्या असून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी मजबूत आधारव्यवस्था उभारण्याची गरज आहे. टेलीसायकियाट्रीसारख्या डिजिटल उपायांमुळे मानसिक आरोग्यसेवा अधिक सुलभ होऊ शकतात.
दरम्यान, प्रिसिजन मेडिसिन आणि जनुक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे डॉक्टरांना या क्षेत्रातील सखोल ज्ञान आवश्यक बनले आहे. वैयक्तिक उपचार पद्धती विकसित होत असल्या तरी गोपनीयता, नैतिकता आणि खर्च यांसारखी आव्हानेही निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जनुकशास्त्रासोबत नैतिक निर्णयक्षमता आणि प्रभावी संवादाचे प्रशिक्षण देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये वाढता ताण आणि मानसिक आरोग्याच्या समस्या लक्षात घेता त्यांच्यासाठी मजबूत आधारव्यवस्था उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. एकूणच वैद्यकीय शिक्षण अधिक आधुनिक आणि सर्वसमावेशक करण्याची वेळ आली असून, त्याद्वारे भविष्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी सक्षम डॉक्टर तयार होऊ शकतात, असा निष्कर्ष संशोधकांनी मांडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com