सह्याद्रीच्या कुशीत रंगणार पर्यटनाचा उत्सव

सह्याद्रीच्या कुशीत रंगणार पर्यटनाचा उत्सव
Published on

सह्याद्रीच्या कुशीत पर्यटनाचा उत्सव
पाटण येथे रंगणार ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव’

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ३१ : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील निसर्गसौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन सातारा आणि विभागीय पर्यटन संचालनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे २ ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत हा भव्य महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवामुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला. या महोत्सवात पर्यटक, शेतकरी आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

​पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. रांगडा शाहिरी पोवाडा कार्यक्रम, भक्तिरसात न्हाऊन निघणारा भजनी मंडळांचा कार्यक्रम, ब्रास बँड पथकाचा चित्तथरारक परफॉर्मन्स, लावणी महोत्सव, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या​ ​महोत्सवात अभिनेता भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, स्पृहा जोशी, संस्कृती बालगुडे, जान्हवी किल्लेकर, प्रियदर्शन जाधव, हेमांगी कवी यांसह प्रसिद्ध गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर आणि अभिजित जाधव आपली कला सादर करणार आहेत. या वेळी पर्यटकांना साहसी खेळांचाही आनंद घेता येईल. यामध्ये जलक्रीडा व हवाई सफर, जेटस्की, बोटिंग शर्यत, पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग आणि चक्क सीप्लॅन राईड, ट्रेकिंग, रॉक क्लायंबिंग, उंट सफारी आणि घोडेस्वारी यांचा समावेश आहे. याशिवाय शस्त्र प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन आणि इलेक्ट्रिक बग्गी यांसारख्या पारंपरिक गोष्टीदेखील न्याहाळता येणार आहेत.

बहुआयामी अनुभव
‘ग्रामीण आणि साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी हे महोत्सव मैलाचा दगड ठरतील. यातून स्थानिक कौशल्य आणि संस्कृतीचा संगम साधला जाईल.’ अशी भावना पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी व्यक्त केली. तर ‘पाटण आणि सातारा जिल्ह्याची पर्यटन ओळख अधिक दृढ करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. पर्यटकांना येथे नैसर्गिक सौंदर्यासोबतच बहुआयामी अनुभव मिळेल.’ अशी प्रतिक्रिया पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी व्यक्त केली.

​आरोग्य पर्यटनालाही प्रोत्साहन
कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच योग, ध्यान आणि आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून आरोग्य पर्यटनालाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांच्यासाठी विशेष ‘फॅम टूर’ आयोजित केली जाणार आहे.​

.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com