सुक्या पानांच्या कचऱ्यापासून तयार केला गॅस

सुक्या पानांच्या कचऱ्यापासून तयार केला गॅस
Published on

सुक्या पानांच्या कचऱ्यापासून तयार केला गॅस
आयआयटीचा मुंबईचा यशस्वी प्रयोग; कॅम्पसमध्ये दशकभर वापर
मुंबई, ता. १ ः आयआयटी मुंबई येथील संशोधकांनी सुक्या पानांच्या कचऱ्यापासून स्वयंपाकासाठी गॅस तयार करण्याचे पेटंट तंत्रज्ञान विकसित केले असून, त्यामुळे एलपीजीवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी करण्यात यश आले आहे. सध्या एलपीजी पुरवठ्याबाबत निर्माण होणाऱ्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही नवकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
आयआयटीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांपासून या तंत्रज्ञानाचा वापर कॅम्पसमध्ये केला जात असून, त्यामुळे एलपीजीचा वापर सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाला आहे. २०१४ मध्ये रासायनिक अभियांत्रिकी विभागातील प्रा. संजय महाजनी यांनी कॅम्पसमधील सुक्या कचऱ्याचे स्वयंपाकाच्या इंधनात रूपांतर करण्यासाठी बायोमास गॅसिफिकेशनची संकल्पना मांडली. सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये काही अडचणी आल्या. भारतीय बायोमासमुळे क्लिंकर तयार होऊन यंत्रणा बंद पडत होती आणि सुमारे ३० मिनिटे धूर निर्माण होत होता. तथापि, संशोधकांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि २०१६ पर्यंत विकसित केलेल्या पेटंट गॅसिफायरमुळे क्लिंकर निर्मितीत शंभर पट घट करण्यात यश मिळाले.
या प्रक्रियेत सुक्या पानांचे संकलन करून त्यांचे छोटे तुकडे तयार केले जातात. त्यानंतर हे पेलेट्स कमी ऑक्सिजन असलेल्या कक्षात तापवले जातात. या प्रक्रियेत पायरोलिसिस आणि गॅसिफिकेशन होऊन इंधनयुक्त वायू तयार होतो, जो स्वच्छ जळतो आणि स्वयंपाकासाठी योग्य स्थिर ज्वाला निर्माण करतो.
२०१७ मध्ये ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील प्रा. संदीप कुमार यांनी या प्रकल्पात सहभाग घेत नवीन बर्नर डिझाइन विकसित केले आणि या तंत्रज्ञानासाठी पेटंट मिळवले.
सध्या आयआयटी मुंबईच्या कर्मचारी कँटीनमध्ये या तंत्रज्ञानामुळे ३० ते ४० टक्के एलपीजीची बचत होत असून, ६० टक्के उष्णता कार्यक्षमता साध्य झाली आहे. तसेच, उत्सर्जन २० पीपीएमपेक्षा कमी ठेवण्यात यश आले आहे.

दरवर्षी सुमारे ५० लाख रुपयांची बचत
हे तंत्रज्ञान ‘इन्फिक्सेन एनर्जी’ कंपनीला परवाना देण्यात आले असून, आता ते मोठ्या वसतिगृहांमध्ये वापरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या माध्यमातून दरवर्षी सुमारे ५० लाख रुपयांची बचत, ९० टन एलपीजीची बचत आणि ३०० टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com