

अनिल अंबानींविरुद्ध
आक्रस्ताळेपणा नको!
उच्च न्यायालयाची वृत्तवाहिनीला समज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशी संबंधित वार्तांकन करताना आक्रस्ताळेपणा करू नका. भाषा सौम्य वापरा, अशी समज उच्च न्यायालयाने ‘रिपब्लिक टीव्ही’ आणि या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना दिली.
‘रिपब्लिक टीव्ही’ आणि गोस्वामी यांच्याविरुद्ध अंबानी यांनी उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यावर न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर प्रतिवाद्यांना अंबानींबाबत वार्तांकन करण्यापासून वाहिनीला रोखणार नाही. प्रतिवादी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे; मात्र कोणत्याही अवमानकारक विशेषणांचा वापर केला जाऊ नये, असे एकलपीठाने स्पष्ट केले. अवमानकारक भाषेचा वापर न थांबवल्यास तसा आदेश दिला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहे, त्यांना ते करू द्या. अनैतिक किंवा अनुचित हल्ला करणे योग्य नसल्याचेही न्यायालयाने ‘रिपब्लिक टीव्ही’ आणि गोस्वामी यांना सुनावले.
आर्थिक व्यवहारांविषयी ‘रिपब्लिक टीव्ही’ने प्रसारित केलेल्या बातम्यांमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे एआरजी आउटलायर मीडिया प्रा. लि., गोस्वामी आणि इतर काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध तात्पुरता मनाई हुकूम काढावा, अशी मागणी अंबानी यांनी याचिकेतून केली आहे. तर ‘रिपब्लिक टीव्ही’ आणि गोस्वामीचे वार्तांकन निष्पक्ष असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला. तसेच बाजू मांडण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.