

मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा
काँग्रेसच्या आरोपांवर शिक्कामोर्तब : सुरेशचंद्र राजहंस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः ‘मुंबई महापालिका सध्या भ्रष्टाचाराचे कुरण बनली असून, सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये केवळ ‘मलई’ खाण्यावरून वाद सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासक राजवटीत मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशांवर दरोडा टाकण्यात आला असून, आता १,००० कोटींचे कंत्राट रद्द झाल्यामुळे काँग्रेसने केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले आहे; मात्र केवळ कंत्राट रद्द करून चालणार नाही, तर या भ्रष्टाचाराच्या दलदलीत सामील असलेल्या अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा,’ अशी मागणी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी शनिवारी (ता. ४) केली.
राजहंस यांनी सांगितले, की ‘मुंबई काँग्रेसने महापालिकेतील भ्रष्ट कारभाराविरोधात पत्रकार परिषदांची मालिका घेऊन सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पाडले आहे. भाजप आणि शिंदे गट केवळ सत्तेसाठी एकत्र आले असून, त्यांना मुंबईकरांच्या आरोग्य, शिक्षण, पाणी किंवा बेस्ट सेवेशी काहीही देणेघेणे नाही, गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासक राजवटीत केवळ लाडक्या कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे आणि टक्केवारीतून स्वतःची घरे भरण्याचे काम सुरू आहे. केवळ राजकीय कुरघोडी करण्यासाठी एक हजार कोटींची कंत्राटे रद्द केली गेली आहेत; पण आम्हाला त्यांच्या अंतर्गत राजकारणात रस नसून मुंबईकरांच्या पैशाचा हिशेब महायुतीला द्यावाच लागेल.’ भाजपवर टीका करताना राजहंस म्हणाले, ‘मुंबईची तिजोरी लुटण्यात भाजपही मागे नाही.’
..
श्वेतपत्रिका काढण्याची मागणी
मुंबईतील मोक्याच्या ठिकाणची शेकडो एकर जमीन अदाणीला कुणाच्या फायद्यासाठी दिली, सर्व नियम आणि अटी धाब्यावर बसवून हे निर्णय कोणासाठी घेतले, भाजपला जर खरोखरच भ्रष्टाचारमुक्त मुंबई हवी असेल, तर त्यांनी महापालिकेतील सर्व कामांची आणि मुंबईला लुटणाऱ्या निर्णयांची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची हिंमत दाखवावी, अशी मागणीही मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.