स्पर्धा परीक्षांसाठी वसतिगृहांची दारे उघडी!

स्पर्धा परीक्षांसाठी वसतिगृहांची दारे उघडी!
Published on

स्पर्धा परीक्षांसाठी वसतिगृहांची दारे उघडी!
मुंबईतील अकरावी, बारावीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
मुंबई, ता. ७ ः मुंबई आणि परिसरात अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेणाऱ्या आणि शासकीय वसतिगृहांमध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत त्याच वसतिगृहांमध्ये राहून जेईई, एमएच-सीईटी, नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करता येणार आहे. या काळात त्यांना वसतिगृहांमध्ये राहणे आणि खाण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने शेकडो विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.
सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने यासाठी आदेश जारी करून मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये राहत असलेल्या शेकडो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यातील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधीपासून काही नियम लागू होते. परिशिष्ट ‘अ’ मधील तरतुदीनुसार, वसतिगृह प्रवेश नियमावलीतील अनुक्रमांक ५ नुसार विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालय सुरू होण्याच्या आधीच्या दिवसापासून ते वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यानंतरच्या दिवसापर्यंत वसतिगृहात राहण्याची परवानगी होती. मात्र, या कालावधीत जर शैक्षणिक संस्थांना सलग १० दिवस किंवा त्याहून अधिक सुट्टी असेल, तर त्या काळात विद्यार्थ्यांना भोजन किंवा कोणताही भत्ता दिला जात नव्हता. तसेच, वार्षिक परीक्षा संपल्यानंतर आणि पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या दरम्यान विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहायचे असल्यास, संबंधित शाळा, महाविद्यालय प्रमुखांच्या शिफारशीनंतर समाजकल्याण अधिकारी (वर्ग १) यांची लेखी परवानगी आवश्यक होती. या कालावधीतही विद्यार्थ्यांना भोजन किंवा भत्ता मिळत नव्हता.

असे होत होते परिणाम
दरवर्षी अकरावी व बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर अनेक महाविद्यालयांमध्ये ‘समर क्लासेस’ घेतले जातात. याच कालावधीत विद्यार्थी इंजिनिअरिंग व वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या स्पर्धा परीक्षांपैकी एमएच-सीईटी, जेईई, नीट, एनडीए आदी परीक्षांची यांची तयारी करतात, परंतु उन्हाळी सुट्टीत शासकीय वसतिगृहे बंद ठेवली जात असल्यामुळे ग्रामीण भागातील, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शहरांमध्ये राहण्याची मोठी अडचण निर्माण होत होती. शासनाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, राज्यातील गुणवत्तापूर्ण मानव संसाधन तयार करण्याच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणार असल्याची प्रतिक्रिया फुले-शाहू-आंबेडकर विद्यार्थी-पालक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण यादव यांनी दिली.

असा मिळणार दिलासा
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समर क्लासेसला उपस्थित राहून शिक्षण घेणे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणे सुलभ होईल. या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणतेही भत्ते, अनुदान किंवा शासकीय साहित्य देण्यात येणार नाही. यात निवासाची सुविधा उपलब्ध असेल, परंतु भोजनाची व्यवस्था विद्यार्थ्यांना स्वतः करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com