

वांद्रे येथील भाभा रक्तपेढीचा
परवाना पुन्हा निलंबित
बनावट कर्मचारी दाखवल्याने एफडीएची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा मुंबई महापालिकेच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालयातील रक्तपेढीचा चार दिवसांसाठी परवाना निलंबित केला आहे. रक्तपेढीत कार्यरत तंत्रज्ञांची संख्या चुकीची दाखविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात भाभा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनोद खाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.
रक्तपेढीचा परवाना कायम ठेवण्यासाठी किमान आवश्यक तंत्रज्ञांची नियुक्ती बंधनकारक असते. त्यानुसार रक्तपेढीच्या प्रशासनाने वैशाली भारती, स्मिता आंब्रे आणि वर्षा झांझे या तीन तंत्रज्ञांची नियुक्ती दाखवली हाेती. प्रत्यक्षात हे तंत्रज्ञ रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील असून, तपासणीदरम्यान त्यांना रक्तपेढीत दाखविण्यात आले होते.
आरोग्य विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, या तंत्रज्ञांची रक्तपेढीत नियमित नियुक्ती नसल्यामुळे रक्तपेढी २४ तास सुरळीत चालविणे शक्य होत नव्हते. रात्रीची ड्युटी टाळण्यासाठी कर्मचारी रक्तपेढीत काम करण्यास टाळाटाळ करीत असल्याचीही माहिती समोर आली आहे. ‘आमची नियुक्ती लॅब तंत्रज्ञ म्हणून झाली असताना आम्ही रक्तपेढीत का काम करावे,’ असा सवालही काही कर्मचाऱ्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
पहिल्यांदा मे २०२५मध्ये अशा प्रकारचा गैरप्रकार उघड झाला होता. त्यानंतर एफडीएने संबंधित तंत्रज्ञांना पूर्णवेळ रक्तपेढीत नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते. जुलै २०२५मध्येही दाेन दिवसांसाठी परवाना निलंबित करण्यात आला होता. तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने सप्टेंबर २०२५मध्ये एफडीएच्या सह आयुक्तांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली होती. फेब्रुवारी २०२६च्या तपासणीतही अनियमितता उघडकीस आली. त्यानंतर एफडीएने कठोर पाऊल उचलून रक्तपेढीचा परवाना चार दिवसांसाठी निलंबित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.