नव्या पारेषण वाहिन्यांमुळे मुंबईकरांना स्वस्त वीज मिळणार

नव्या पारेषण वाहिन्यांमुळे मुंबईकरांना स्वस्त वीज मिळणार
Published on

नव्या पारेषण वाहिन्यांमुळे मुंबईकरांना स्वस्त वीज मिळणार
- आरे-कुडूस, विक्रोळी-खारघर वहिनीने राज्यातील अतिरिक्त विजेचा पर्याय खुला; युनिटमागे ३५-४५ पैसे वीजदर कमी होईल
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : आरे-कुडूस आणि विक्रोळी-खारघर यादरम्यानच्या उच्चदाब वीजवाहिन्या कार्यन्वित झाल्याने मुंबईकरांना राज्यभरात उपलब्ध असलेली स्वस्त वीज मिळू शकणार आहे. आतापर्यंत मुंबई लगतच्या वीज प्रकल्पांमध्ये तयार होणाऱ्या विजेच्या तुलनेत राज्यात स्वस्त वीज असतानाही केवळ अपुऱ्या वीजवाहिन्यांमुळे ती मुंबईत आणण्यावर मर्यादा येत होत्या. मात्र, सदर दोन वीजवाहन्या कार्यान्वित झाल्याने बेस्ट, टाटा पाॅवर आणि अदाणी इलेक्ट्रिसिटीला गरजेनुसार २,००० मेगावाॅटपर्यंत वीज राज्यभरातून मुंबईत आणणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रतियुनिट ३५-४५ पैसे विजेचा दर कमी होऊ शकेल.
मुंबईत अदाणी इलेक्ट्रिसिटी, टाटा पाॅवर आणि बेस्टचे सुमारे ४७ लाख वीजग्राहक असून, त्यांच्याकडून सर्वसाधारणपणे दररोज २,५००-३,००० मेगावाॅट एवढी विजेची मागणी नोंदली जाते, तर उन्हाळ्यात आणि ऑक्टोबर हिटच्या काळात ही मागणी चार हजार मेगावाॅटपर्यंत जात आहे. दरम्यान, बेस्टला टाटा पाॅवरकडून वीजपुरवठा केला जात असून, टाटा स्वत:च्या वीज प्रकल्पातील वीज वापरते, तर अदाणी इलेक्ट्रिसिटी स्वत:च्या डहाणू वीज केंद्रासह इतर ठिकाणांहून वीज घेते. दरम्यान, मुंबई परिसरातील वीज केंद्रातून उपलब्ध होणाऱ्या विजेच्या तुलनेत राज्यात कमी दराने वीज उपलब्ध होत आहे. मात्र, सदरची वीज मुंबईत वाहून आणण्यासाठी पुरेशा वीजवाहिन्या नसल्याने मर्यादा येत होत्या. मात्र, मागील वर्षी खारघर-विक्रोळी ही ४०० केव्हीची उच्चदाब वीजवाहिनी कार्यन्वित झाली असून, आरे-कुडूस ही वीजवाहिनीही नुकतीच कार्यन्वित झाली आहे. त्यामुळे त्यामाध्यमातून राज्यभरातील वीज केंद्रातून तब्बल २,००० मेगावाॅटपर्यंत वीज आणणे शक्य होणार आहे.

राज्यभरातून मुंबईत आणली जाणारी वीज आणि दर

बेस्ट
- सरासरी ८००-९०० मेगावाॅटची दैनंदिन आवश्यकता
- बहुतांश वीज टाटा पाॅवरकडून घेतली जात असून, त्याचा प्रतियुनिटचा सरासरी दर चार रुपयांच्या घरात आहे.
- मुंबई बाहेरून साईवर्धा वीज कंपनीकडून १२५ मेगावाॅट वीज २.७३ रुपये प्रतियुनिट दराने घेतली जाते.

टाटा पाॅवर
- दररोज सरासरी ७०० मेगावाॅट विजेची आवश्यकता
- टाटाच्या खोपोली येथील जलविद्युत प्रकल्पातील विजेचा दर कमी असला तरी ट्राॅम्बे येथील वीज केंद्रातील विजेचा दर ४-४.३० रुपये प्रतियुनिटच्या घरात असल्याने मुंबईबाहेरून जिंदालच्या वीज केंद्रातून काही प्रमाणात वीज घेतली जाते.
- मुंबईबाहेरून जिंदाल कंपनीकडून ७० मेगावाॅट वीज घेतली जात असून, त्याचा प्रतियुनिटचा दर २.७२ रुपये एवढा आहे.

अदाणी इलेक्ट्रिसिटी
- दररोज सरासरी १,२००-१,४०० मेगावाॅट विजेची आवश्यकता
- ५२५ मेगावाॅट क्षमतेचे डहाणू वीज केंद्र स्वमालकीचे असून, त्यामधून उपलब्ध होणाऱ्या प्रतियुनिट विजेचा दर ३.६३ रुपये एवढा आहे.
- सुमारे ४२५ मेगावाॅट वीज मुंबईबाहेरील वीज केंद्रातून घेतली जाते. त्यामध्ये जिंदालकडून २.७१ रुपये प्रतियुनिट दराने १०० मेगावाॅट, आयडियल एनर्जीकडून २.७६ रुपये प्रतियुनिट दराने ५० मेगावाॅट, धारीवालकडून २.७६ रुपये प्रतियुनिट दराने १२५ मेगावाॅट, तर साई वर्धाकडून २.७८ रुपये दराने १०० मेगावाॅट वीज घेतली जात आहे.

राज्यातून मुंबईत आणल्या जाणाऱ्या प्रतियुनिटचा विजेचा दर पावणेतीन रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे आता मुंबईत वीज आणण्यासाठीच्या उच्चदाब वीजवाहिन्या वाढल्याने संबंधित कंपन्यांनी मुंबईबाहेरून वाढीव वीज आणल्यास निश्चित विजेच्या दरात कपात होईल.
- डाॅ. अशोक पेंडसे, वीजतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com