महिला आरक्षण विधेयकावरून पालिका सभागृहात रणकंदन

महिला आरक्षण विधेयकावरून पालिका सभागृहात रणकंदन
Published on

महिला आरक्षण विधेयकावरून पालिका सभागृहात रणकंदन
सात तास चाललेल्या चर्चेत आरोप-प्रत्यारोपांची सरबत्ती

मुंबई, ता. २१ ः केंद्र सरकारने महिलांना आरक्षण देण्याबाबतचे मांडलेले विधेयक दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने नामंजूर झाले. भाजप सरकारवर पराभवाची नामुष्की ओढवली. त्याचे तीव्र पडसाद सोमवारी (ता. २०) मुंबई महापालिका सभागृहात उमटले. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आणि दोन्ही बाजूच्या जोरदार घोषणांनी पालिका सभागृह दणाणून गेले. पालिका सभागृहात गटनेते, समिती अध्यक्ष, नगरसेवक आदींनी सलग सात तास चर्चा केली.
पालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर यांनी निवेदनाद्वारे काँग्रेससह विरोधी पक्षांचा निषेध व्यक्त केला. महायुतीच्या नगरसेवकांनी काळे कपडे परिधान करून निषेध व्यक्त केला. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भगवे कपडे परिधान करून तर काँग्रेस नगरसेवकांनी पक्षाचा मफलर घालून भाजप-शिवसेना महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न केला.
विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यसह काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी, एमआयएम पक्षाचे गटनेते विजय उबाळे, अंकित प्रभू, सचिन पडवळ आदी नेत्यांनी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी, महिला आरक्षणाला विरोध नसून या विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना आणि खासदारांच्या संख्येत मोठी वाढ करण्याचे कारस्थान होते, असा आरोप करीत सत्ताधारी भाजप-शिवसेना महायुतीला प्रत्युत्तर दिले.
भाजप सरकारमध्ये एवढीच हिंमत असेल तर लोकसभेच्या ५४३ जागांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देत पुन्हा निवडणुका घेऊन दाखवाव्यात, आम्ही महिलांच्या आरक्षणाला पाठिंबा देऊ, असे आव्हान काँग्रेस पक्षाचे गटनेते अश्रफ आजमी यांनी भाजपला दिले.
गेली ७० वर्षे सत्ता उपभोगणारा काँग्रेस पक्ष महिलांविरोधात कशी चुकीची भूमिका घेत आहे, याची उदाहरणे देत भाजपकडून सभागृह नेते गणेश खणकर, नवनाथ बन, प्रकाश दरेकर, राखी जाधव, तृष्णा विश्वासराव, संध्या दोशी, प्रिती सातम, तेजिंदर तिवाना, सिद्धार्थ शर्मा, शीतल गंभीर, संगीता शर्मा, राजेश्री शिरवडकर आदींनी विरोधी पक्षावर तुटून पडत चांगलीच तोफ डागली.

हा महिलांचा अवमान ः महापौर
विरोधकांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक नामंजूर करून महिला भगिनींवर क्रूर आघात केला आहे. तसेच, तथाकथित पुरोगामी, संधीसाधू लोकांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक रोखून महिलांचा अपमान केला आहे, असा आरोप महापौर रितू तावडे यांनी केला.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com