मराठी सक्‍तीवरून वातावरण तापले

मराठी सक्‍तीवरून वातावरण तापले
Published on

मराठी सक्‍तीवरून वातावरण तापले
काहींचा निर्णयाला पाठिंबा, तर काहींचा ‘भाषावाद’ म्हणून विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्या रिक्षा किंवा टॅक्सीचालकांचे परवाने १ मेपासून रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यावर मुंबईकरांची संमिश्र भूमिका आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे की, मोटार परिवहन विभागामार्फत रिक्षा किंवा टॅक्सीचालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचे म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान असणे हा नियम आधीपासूनच लागू आहे. मात्र, मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही. तसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. त्‍या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत विविध ठिकाणचे रोजगारासाठी येतात. तसेच मुंबईतील काही कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी दुसऱ्या राज्यात जातात. मुंबईतही मराठीशिवाय हिंदी किंवा इंग्रजी अनेक जण बोलतात. त्या भाषेतून त्यांचा संवाद होत असतो. रिक्षा आणि टॅक्सी हे वाहतुकीचे साधन आहे त्यामुळे भाषवाद उभा करणे चुकीचे आहे.
- वसंतसेना श्रीनिवासन, प्रवासी

मुंबईत मराठीची सक्ती करणे चुकीचे आहे. इंग्रजी ही जगाची भाषा आहे. कित्येक जण इंग्रजी बोलतात. भाषा शिकण्यासाठी स्वातंत्र्य द्यायला हवे, जबरदस्तीने एखाद्याला भाषा शिकवता येणार नाही. रिक्षा-टॅक्सीचालक असो किंवा अन्य कोणी प्रत्येकाला आपल्या रोजीरोटीची चिंता आहे. भाषेची सक्ती हा राजकारणचा भाग असेल असे वाटते.
- हितेश रुपानी, प्रवासी

महाराष्ट्रात राहत असतील, तर मराठी बोलायला हवे. मराठी न बोलण्यामुळे स्थानिकांना अडचण होते. ज्यांना मराठी येत नाही, त्यांनी मराठी भाषा शिकून घेतली पाहिजे. त्याचा फायदा व्यावसाय वाढण्यासाठी होईल.
- पियुष तांबे, प्रवासी

कित्येक वर्षांपासून काही जण मुंबईत आहेत, पण मराठी शिकत नाहीत. त्यांनी भाषा शिकली पाहिजे. काही जण मराठी शिकणारच नाही, असे सांगतात ते चुकीचे आहे. दरम्यान, भाषा शिकवावी परंतु त्यासाठी मारहाण करणे योग्य नाही.
- दिवाकर बनसोडे, प्रवासी

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com