

लोकलवर रॉड आदळल्याने दोघे जखमी
कामादरम्यान सुरक्षेचा अभाव; तीन कर्मचारी निलंबित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : रेल्वे रुळांलगत सुरू असलेल्या कामादरम्यान सुरक्षा उपाययोजनांकडे पुरेसे लक्ष न दिल्याने अपघाताची घटना घडली आहे. कल्याण-कसारा मार्गावर खर्डी ते उंबरमाळी स्थानकादरम्यान धावत्या लोकलवर लोखंडी रॉड आदळल्याने दोन प्रवासी जखमी झाले. याप्रकरणी मध्य रेल्वेने अभियांत्रिकी विभागातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
बुधवारी सायंकाळी सुमारे ४.४५च्या सुमारास रुळांलगतच्या उतारावर संरक्षणात्मक जाळी बसवण्याचे काम सुरू होते. या वेळी कामादरम्यान तीन मीटर लांबीचा लोखंडी रॉड उडून धावत्या लोकलवर आदळला. त्याच वेळी काही दगडही उडाल्याने दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांना फटका बसला. या अपघातात एकनाथ थोमरे (वय ४५) यांच्या चेहऱ्यावर लोखंडी रॉड आदळून डोके व डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. अचानक झालेल्या धडकेत ते डब्याबाहेर फेकले गेले. त्यांना प्रथम कसारा ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर शहापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते कुटुंबातील एकमेव कमावते असून त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. दुसरे प्रवासी रोहित सरकुटे (वय २४) यांना दगड व ढिगाऱ्याचा फटका बसून मांडीला दुखापत झाली. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
प्रवासी सुरक्षिततेशी तडजोड
रुळांलगत काम करताना ब्लॉक घेणे अनिवार्य असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. हा प्रकार केवळ नियमभंग नसून प्रवासी सुरक्षिततेशी केलेली गंभीर तडजोड असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, जबाबदारी निश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवासी व साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.