विधानपरिषदेसाठी शिवसेनेत रस्सीखेच

विधानपरिषदेसाठी शिवसेनेत रस्सीखेच
Published on

विधान परिषदेसाठी शिवसेनेत रस्सीखेच
एका जागेवर बच्चू कडूंच्या नावाची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः विधान परिषदेत रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये शिवसेनेच्या कोट्यातील दोन जागा आहेत. यापैकी एका जागेवर बच्चू कडू यांना संधी देण्याची तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे. दुसरीकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे पक्षांतर्गत वाद उफाळून आल्याचे चित्र आहे.

शिवसेनेने विदर्भातून संजय राठोड आणि आशीष जयस्वाल यांना मंत्रिपदाची संधी दिली; मात्र हे दोघेही मतदारसंघ किंवा जास्तीत जास्त जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भात संघटना वाढवणारा तसेच भाजपसोबत सलगी नसलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्याचा विचार एकनाथ शिंदे यांचा आहे आणि समीकरणात बच्चू कडू योग्य ठरतात. सलग तीन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या बच्चू कडू यांचा २०२४ मध्ये अचलपूर मतदारसंघातून धक्कादायक पराभव झाला होता; मात्र पराभवाने खचून ना जात वर्षभरात कडू यांनी अनेक मोठी आणि आक्रमक शेतकरी आंदोलने उभारली. त्यांच्या आंदोलनांमुळे फडणवीस सरकारला कर्जमाफी जाहीर करावी लागली. त्यामुळे कडू यांचे महत्त्व एकनाथ शिंदे ओळखून आहेत; मात्र कडू यांच्या भाजपविरोधी भूमिकेमुळे शिवसेनेतील अनेकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे समजते. भाजप नेतृत्वालाही कडू यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचीही चर्चा आहे.


विलीनीकरणाचा पेच
बच्चू कडू यांना आमदारकी तसेच पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे; मात्र पक्षांतर्गत आणि भाजपकडून झालेल्या विरोधानंतर त्या बदल्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण करावे, अशी अट एकनाथ शिंदे यांनी घातल्याचे कळते. कडू यांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून विदर्भ आणि राज्यात पक्षाचा विस्तार करण्याचा विचार यामागे आहे. यापूर्वीही अशाच स्वरूपाचा प्रस्ताव तत्कालीन एकसंघ शिवसेनेकडून देण्यात आला होता; मात्र पुढे शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे हा प्रस्ताव बारगळला असल्याचे कळते. भाजपच्या वाढत्या वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर कडू यांना आमदारकी देणे, हे पक्षवाढीच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल, असे शिंदे यांचे मत आहे; मात्र एवढ्या संघर्षानंतर उभी केलेली संघटना विसर्जित करण्याचा पेच कडू यांच्यापुढे आहे. तरीही सध्याच्या परिस्थितीत राजकीय अस्तित्व टिकवण्यावर प्रहारचा भर असेल, त्यामुळे ते ही ऑफर स्वीकारण्याची शक्यता अधिक आहे.


सर्व कार्यकर्त्यांसोबत माझे बोलणे सुरू आहे. यावर उद्या अधिकृत निर्णय जाहीर करू.
- बच्चू कडू, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com