सहावर्षे उलटली तरी टॅक्सीवर दिवा लागेना

सहावर्षे उलटली तरी टॅक्सीवर दिवा लागेना
Published on

टॅक्सीवर दिवे लावण्याचा नियम लांबणीवर
सहा वर्षे उलटूनही प्रत्यक्षात कार्यवाही नाही

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः मुंबईकरांना घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर या प्रवासात टॅक्सीचालक अनेकदा भाडे नाकारतात. यावर उपाय म्हणून टॅक्सीवर हिरवा, लाल, पांढरा असे तीन दिवे लावण्याचा निर्णय १ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आला होता; मात्र एमएमआरटीए (मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण) बैठकीत त्याला सातत्याने मुदतवाढ मिळाली. अशात सहा वर्षे उलटली तरी अद्याप हा निर्णय प्रत्यक्षात साकारलेला नाही.

१ फेब्रुवारी २०२० पासून नव्या टॅक्सीची नोंद करताना छतावर दिवे बसविल्याची खात्री करूनच गाडीची नोंदणी करावी, अशी अधिसूचना नोव्हेंबर २०१९ मध्ये सरकारने काढली होती, तर जुन्या टॅक्सीला छतावर दिवे बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली. या निर्णयाला साडेचार वर्षांहून अधिक काळ उलटला आहे; मात्र यावर पुढील निर्णय अद्याप झालेला नाही. तसेच एमएमआरटीएने यात वारंवार मुदतवाढ दिली असून टॅक्सीवर दिवा लागणार कधी, टॅक्सीचालकांच्या मनमानीपणाला वेसण घालणार कधी, असा सवाल मुंबईकर करताना दिसत आहेत.
===
असे असतील तीन दिवे
टॅक्सीवर हिरवा, लाल आणि पांढरा असे तीन दिवे असतील. हिरवा दिवा सुरू असल्यास टॅक्सी भाडे घेण्यास उपलब्ध आहे, असे प्रवाशांनी समजावे. तर लाल दिवा असेल, तर त्यात प्रवासी आहे, असे समजावे. त्याच वेळी पांढरा दिवा पेटता असेल, तर टॅक्सी सध्या भाडे स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसेल, असा त्याचा अर्थ होईल. हे दिवे एलईडी असणार असून प्रत्येक दिव्याचा अर्थ मराठी आणि इंग्रजीतून लिहिणे बंधनकारक असणार आहे. तर तिन्हीपैकी एक दिवा पेटता ठेवणेही गरजेचे असणार आहे. दरम्यान, ट्रॅक्सीवरील दिवे बसवण्याच्या प्रस्तावावर मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
==
अनधिकृत खासगी टॅक्सीला परिवहन विभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे; मात्र नियमाने चालणाऱ्या टॅक्सीचालकांना अडचणीत आणत आहेत. नवे नवे नियम त्यांच्यावर लादले जात आहेत. टॅक्सीवर दिवे लावण्याची आवश्यकता नाही.
- के. के. तिवारी, अध्यक्ष, भाजप रिक्षा-टॅक्सी सेल
-------
मुंबई सेंट्रल आरटीओ
एकूण टॅक्सी - २६,५४४
......
वडाळा आरटीओ
एकूण टॅक्सी - ८,२६३
......
अंधेरी आरटीओ
एकूण टॅक्सी - ६,४१८
......
बोरिवली आरटीओ
एकूण टॅक्सी - १,६११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com