

वांद्रे, वरळी, अंधेरीतील वसाहतींचा कायापालट
म्हाडाला तीन-चार हजार घरे मिळणार; एक लाख ५४ हजार चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळ उपलब्ध होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : वांद्रे रिक्लेमेशन, वरळी येथील आदर्शनगर आणि अंधेरीच्या सरदार वल्लभाई पटेल (एसपीव्ही) नगरच्या सुमारे २०० एकरांवरील इमारतींचा म्हाडा बांधकाम आणि विकास संस्थेच्या (सीॲण्डए)च्या माध्यमातून पुनर्विकास करणार आहे. त्या माध्यमातून रहिवाशांबरोबरच म्हाडाही घरंदाज होणार आहे. जवळपास एक लाख ५४ हजार चौरस मीटर एवढे बांधीव क्षेत्रफळ मिळणार आहे. त्यामध्ये ३,०००-४,००० हजार घरे तयार होऊ शकणार असल्याने भविष्यात सामान्यांच्या लॉटरीसाठी म्हाडाला मुबलक घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत.
वांद्रे रिक्लेमेशन परिसरातील १,९७,४६६ चौरस मीटरचा (९८ एकर), आदर्शनगरची (वरळी) ६८,०३४ चौरस मीटर (१७ एकर), सरदार वल्लभभाई पटेल नगर (अंधेरी पश्चिम) येथे सुमारे ७० एकराचे क्षेत्र असून, तिथे ६,९८३ रहिवासी आहेत. त्याच्या समूह पुनर्विकासाला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर म्हाडाने आराखडा तयार करून उच्चाधिकार समितीला सादर केला होता. त्यानुसार नुकत्याच झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर म्हाडाने बांधकाम आणि विकास संस्थेच्या नियुक्तीसाठी निविदा मागवल्या आहेत. त्यामध्ये रहिवाशांना देय असलेल्या क्षेत्रफळाबरोबरच म्हाडाला किती बांधीव क्षेत्रफळ द्यावे लागेल, याबाबत अट घातली आहे. त्यानुसार तिन्ही वसाहतींच्या पुनर्विकासातून जवळपास एक लाख ५४ हजार चौरस मीटरचे बांधीव क्षेत्रफळ म्हाडाला देणे बंधनकारक असणार आहे. त्यानुसार या ठिकाणी ४००-५०० चौरस फुटांच्या सदनिका तयार केल्यास तीन-चार हजार घरे म्हाडाला उपलब्ध होऊ शकतील. दरम्यान, वरळी आणि वांद्रे रिक्लेमेशन येथे म्हाडाला घरे किंवा प्रीमियम म्हणून रक्कम देण्याचा पर्याय असल्याने त्यामुळे मिळणाऱ्या घरांच्या संख्येत बदल होऊ शकतो.
म्हाडाला काय मिळणार?
- आदर्शनगर, वरळी - २३ हजार २८१ चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळ किंवा ७६८ कोटी प्रीमियम
- वांद्रे रिक्लेमेशन - ६१ हजार ४९८ चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळ किंवा १८१७ कोटी रुपये प्रीमियम
- एसव्हीपी नगर, अंधेरी - ७४ हजार ७६० चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.