‘सेन्सेक्स’ची ९४० अंशांची उसळी

‘सेन्सेक्स’ची ९४० अंशांची उसळी
Published on

‘सेन्सेक्स’ची ९४० अंशांची उसळी
शांतता कराराच्या आशेने बाजारात जोरदार तेजी

मुंबई, ता. ६ : अमेरिका आणि इराण हे देश शांतता कराराच्या अत्यंत जवळ आल्याने कच्च्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले. त्यामुळे रुपयानेही चांगली वाढ दाखवली. अशा स्थितीत भारतीय शेअर बाजारानेदेखील या घडामोडींचे स्वागत करताना सव्वा टक्का नफा दाखवला. ‘सेन्सेक्स’ ९४०.७३ अंशांनी आणि ‘निफ्टी’ २९८.१५ अंशांनी वाढला.

आज दुपारपर्यंत शेअर बाजार निर्देशांक तोटा दाखवीत होते. ‘सेन्सेक्स’ ७६,७७३ अंशांपर्यंत घसरला होता. मात्र, नंतर अनुकूल जागतिक घटनांमुळे तो तेथून १२०० अंशांनी वाढून ७८ हजारांच्या वर गेला. दिवसअखेर ‘सेन्सेक्स’ ७७,९५८.५२ अंशांवर, तर ‘निफ्टी’ २४,३३०.९५ अंशांवर स्थिरावला.
आज वाहननिर्मिती, प्रसारमाध्यमे, खासगी बँका, सरकारी बँका, बांधकाम व्यवसाय, धातूनिर्मिती, औषधनिर्मिती ही क्षेत्रे एक ते दोन टक्का वाढली. फक्त एफएमसीजी आणि ऊर्जा ही क्षेत्रे घसरली. विमान कंपन्यांना सरकारने अर्थसाह्य जाहीर केल्यामुळे त्यांचे शेअर आज नफा दाखवत होते, तर आयटी शेअर आज घसरले.
आज इंडिगो साडेसहा टक्के वाढला. ट्रेंट, एशियन पेंट, स्टेट बँक, एचडीएफसी बँक या शेअरचे भाव तीन ते चार टक्के वाढले. एटर्नल, ॲक्सिस बँक, महिंद्र आणि महिंद्र, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व्ह, आयसीआयसीआय बँक, मारुती, टाटा स्टील या शेअरचे भाव दोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. सन फार्मा, एअरटेल या शेअरचेही भाव वाढले, तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज दोन टक्के घसरला. एल अँड टी, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, एचसीएल टेक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर या शेअरचे भावही घसरले.

आखातातील तणाव निवळण्याच्या टप्प्यावर असल्यामुळे कच्च्या तेलाचे भाव घसरले असले, तरी किंचित काळजी घेण्याचा कलही आहे. देशांतर्गत चांगले राजकीय संकेत, पायाभूत प्रकल्पांवरील खर्च आणि वेग तसेच सरकारचे एमएसएमई क्षेत्राला अनुकूल धोरण यामुळे आज खरेदी झाली. मात्र, अर्थ, औषधनिर्मिती, वाहननिर्मिती, बांधकाम व्यवसाय यात शॉर्ट कव्हरिंग झाले. त्यामुळे निवडक खरेदी करावी.
-विनोद नायर, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स.

रुपयांत ६८ पैशांनी वाढ
कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने त्याचा परिणाम म्हणून आज भारतीय रुपयाही अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ६८ पैसे वाढून ९४.६० वर स्थिरावला. काल रुपयाने ९५ चा टप्पा ओलांडून ९५.४३ पर्यंत मजल मारली होती. मात्र, आज रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाशिवायच रुपया सावरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com