

चितळसरच्या ‘त्या’ १५६ लॉटरी विजेत्यांची घराची प्रतीक्षा संपणार
भोगवटा प्रमाणपत्र मिळाले; विजेत्यांना लवकरच तात्पुरते देकार पत्र देणार, २५ वर्षांनंतर स्वप्नपूर्ती होणार
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लाॅटरीत चितळसर ठाणे येथील घरांसाठी २५ वर्षांपूर्वी विजेते ठरलेल्या तब्बल १५६ विजेत्यांची अखेर घरांची प्रतीक्षा संपणार आहे. म्हाडाने येथे उभारलेल्या इमारतींना अखेर ठाणे महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाली आहे. त्यामुळे संबंधित विजेत्यांना घरांचा ताबा देण्याबाबत लवकरच तात्पुरते देकारपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे ‘त्या’ विजेत्यांची तब्बल २५ वर्षानंतर गृहस्वप्नपूर्ती होणार आहे.
म्हाडाकडून सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने लाॅटरी काढल्या जातात. त्याचप्रमाणे कोकण मंडळाने २००० मध्ये काढलेल्या लाॅटरीत चितळसर ठाणे येथील अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील २०० घरांचा समावेश होता. त्यानुसार अर्ज केलेल्या १५६ जणांना येथील स्कीममध्ये घरे लागली खरी; पण या भूखंडावर आरक्षण असल्याचे तांत्रिक कारण पुढे करत ठाणे महापालिकेने घरांच्या प्रकल्पाला परवानगी नाकारली होती. दरम्यान, म्हाडाच्या लाॅटरीत विजेते ठरलेल्या अर्जदारांना म्हाडाने त्यांच्याकडून घेतलेली अनामत रक्कम परत केली नव्हती. त्यामुळे ते घराच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, कोकण मंडळाने २०२५ मध्ये काढलेल्या लॉटरीत तत्कालीन विजेत्यांसाठी चितळसर येथील घरे राखीव ठेवली होती.
१५ लाखांनी किमती कमी
म्हाडाने २०२५ मध्ये काढलेल्या लॉटरीत चितळसरच्या घरांच्या किमती ५१ लाखांच्या घरात होत्या; मात्र २०००ला काढलेल्या लाॅटरीच्या वेळी तुलनेने घरांच्या किमती कमी होत्या. त्यामुळे आताच्या किमतीनुसार घर घेणे आमच्या आवाक्याबाहेर असल्याने म्हाडाने घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार म्हाडा प्राधिकरणाने घरांच्या किमती ३१ लाख ४७ हजार रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. तसेच या रकमेवर केवळ चार टक्के व्याज आकारले जाणार असल्याने संबंधित विजेत्यांना ३६ लाखांत घर मिळणार आहे.
चितळसरच्या गृह प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे २५ वर्षांपूर्वी विजेते ठरलेल्या अर्जदारांना लवकरच घराचा ताबा देणे शक्य होणार आहे. त्यासाठी आठवडाभरात तात्पुरते देकारपत्र (पीओएल) देण्यात येतील.
- डॉ. विशाल राठोड,
मुख्य अधिकारी, कोकण मंडळ (म्हाडा)
- लॉटरी विजेते - १५६
- उपलब्ध राखीव घरे - १८१
- २०००ची २१५ चौरस फुटांच्या घरांची किंमत - १ लाख ८७ हजार
- सध्याची ३५० चौरस फुटाच्या घरांची किंमत - सुमारे ३६ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.