थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी एकदा तरी रक्तदान कराच

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी एकदा तरी रक्तदान कराच
Published on

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी एकदा तरी रक्तदान कराच
महापौर रितू तावडे यांचे मुंबईकरांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १०: महापौर म्हणून कामकाजाची धावपळ वाढली आहे, राजकीय व प्रशासकीय जबाबदाऱ्या आपल्या जागी नक्कीच आहेत. सर्वसामान्य नागरिकांनाही विविध जबाबदाऱ्या असतातच. तरीही माणुसकीचे नाते जपण्यासाठी आपण सर्वांनी व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्ताची नितांत आणि नियमित गरज असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. मुंबईकरांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले आहे. व्यस्त कामातून वेळ काढत महापौर रितू तावडे आणि आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी रक्तदान केले.
धारावी आणि परळमध्ये महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध वैद्यकीय सेवा सुविधांचे लोकार्पण, त्यानंतर महापालिका मुख्यालयात बैठका, दुपारी २.३० वाजेपासून सायंकाळपर्यंत महापालिका सभागृह, त्यानंतर कार्यालयीन कामकाज असा दिवसभराचा अत्यंत व्यस्त क्रम आटोपला, त्यानंतर महापौरांनी सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देत थेट शीव रुग्णालय गाठले.
जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून महापौर रितू तावडे आणि सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनीही रक्तदान करून सर्वांसमोर कृतिशील उदाहरण ठेवले. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी या कृतीतून थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना आवश्यक रक्तपुरवठ्याबाबत जनजागृतीस चालना मिळाली आहे.
या वेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे, पॅथॉलॉजी विभागप्रमुख अंजली अमरापूरकर तसेच संबंधित वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com