

देशावरील संकट हे पंतप्रधानांचा नाकर्तेपणा : हर्षवर्धन सपकाळ
मुंबई, ता. ११ : ‘जनतेला त्याग करण्याचा सल्ला व उपदेश देणारे मोदी व त्यांचे सहकारी मात्र कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत. सगळा त्याग जनतेने करायचा आणि नरेंद्र मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषण देत फिरणार का,’ असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. देशावरील संकट हे पंतप्रधानांच्या नाकर्तेपणाचा परिपाक असल्याची टीका त्यांनी केली.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, की ‘जेव्हा जगातील इतर देश संभाव्य संकटासाठी नियोजन आणि तयारी करीत होते, तेव्हा पंतप्रधान निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाचे राजकारण करण्यात मग्न होते. नरेंद्र मोदी यांची निष्काळजी, अहंकारी, लहरी कारभाराची मोठी किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागत आहे. देशात इंधन आणि एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. सोने-चांदी सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहिरातबाजी, फोटोशूट व इव्हेंटबाजीत व्यस्त आहेत. जनतेलाच उपदेश देत स्वतः मात्र ४० ते ५० गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत.’ पुढे त्यांनी सांगितले, की ‘लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मार्चमध्ये देशासमोरील संभाव्य धोक्याचा इशारा दिला होता; पण सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या नरेंद्र मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून देशाला संकटात ढकलले. नोटबंदी, जीएसटी, कोविड संकटानंतर देशावर सर्वात मोठे संकट आले आहे आणि या संकटास नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.