एनएसईकडून बीकेसीमधील दोन भूखंडाची खरेदी

एनएसईकडून बीकेसीमधील दोन भूखंडाची खरेदी
Published on

एनएसईकडून बीकेसीमधील दोन भूखंडांची खरेदी
१,६८४ कोटी रुपये किमती; प्रतिचौरस फुटांचा ३६,००० रुपये दर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : वांद्रे-कुर्ला संकुलातील जागांचे दर गगणाला भिडलेले असतानाच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) सुमारे ११ हजार चौरस मीटरचे दोन भूखंड तब्बल १,६८४ कोटी रुपयांना ८० वर्षांच्या भाडे पट्ट्याने एमएमआरडीएकडून घेतले असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार प्रतिचौरस फुटांचा दर ३६,००० रुपये झाला आहे. गेल्या काही वर्षांत बीकेसी हे देशातील आघाडीचे व्यावसायिक केंद्र बनले असून, बँका, बहुराष्ट्रीय कंपन्या व वित्तीय संस्थांकडून येथे कार्यालये थाटली जात आहेत.
बीकेसीमधील जी ब्लॉकमधील सी-८१ आणि सी-८२ हे भूखंड एनएसईने ८० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर घेतले आहेत. त्यानुसार सुमारे ११ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन्ही भूखंड असून, त्यावर कमाल ४३ हजार ९८० चौरस मीटरचे बांधकाम करण्यास परवानगी असेल, अशी माहिती एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने दिली. या दोन भूखंडांच्या भाडेकरार व्यवहारामुळे एमएमआरडीएला सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांकरिता मोठा निधी उपलब्ध होणार असल्याचेही संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
एनएसईला सी-२ भूखंडातून ८३३ कोटी, तर सी-१ भूखंडासाठी ८५० कोटी रुपये मोजावे लागले असून, सदरच्या भाडेकरारासाठी ७५ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागले आहे. सध्या एनएसईचे मुख्यालय बीकेसीमध्ये असून, भविष्यात त्याचा विस्तार करताना आणि वाढीव सुविधा निर्माण करण्यासाठी मर्यादा येऊ नयेत, यासाठी हे भूखंड भाडेकराराने घेतले आहेत.

एमएमआरडीएचा महसूलवाढीसाठी प्रयत्न
एमएमआरडीएमधून सध्या मुंबईसह एमएमआर क्षेत्रात मेट्रो, रस्ते, उन्नत मार्ग असे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प राबवले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त भूखंड भाडेपट्ट्यावर देऊन महसूलवाढ करतानाच वित्तीय संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जाचा भार कमी करणे, त्यांच्यावरील अवलंबित्व कमी करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच बीकेसीतील आणखी नऊ भूखंड ८० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com