

सहाय्यक आयुक्तांसह पाच जणांवर गुन्हे
अधिकाऱ्यांची काळी गुंतवणूक; व्यावसायिक निशित पटेल अटकेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : वरिष्ठ शासकीय अधिकारी, सेलिब्रिटींच्या काळ्या गुंतवणुकीचे बिंग फोडणाऱ्या निशित पटेल या व्यावसायिकास बुधवारी रात्री गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केली. अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात पालिकेचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर ऊर्फ महेश पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक मंगेश देसाई यांनी सांगितले.
याबाबत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी गुन्हा दाखल झाला असेल; पण मला त्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही, अशी प्रतिक्रिया दिली. वांद्रे येथील मोक्याच्या ठिकाणी गृहप्रकल्प उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकास आर्थिक चणचण आहे. या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास निवासी, व्यावसायिक गाळे कमी किमतीत मिळतील. भविष्यात त्याची किंमत दुप्पट, तिप्पट होईल, असे प्रलोभन दाखवत आरोपींनी टप्प्याटप्याने १८ कोटी रुपये जमविले. त्यासंदर्भात दिलेली कागदपत्रे, दस्तऐवज बनावट असल्याचे लक्षात येताच आरोपींकडे पैशांसाठी तगादा लावला; मात्र पैसे परत करण्याऐवजी पटेल आणि पाटील यांनी एकमेकांकडे बोट दाखवले, असा आरोप हबीबा यांनी आपल्या तक्रारीत केल्याचे सांगण्यात आले. या तक्रारीवरून मालमत्ता कक्षाने बुधवारी खार पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. लगोलग पटेल यांना अटक करण्यात आली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, १९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
--------------
पाटील यांना अटक होईल का?
पटेल यांनी केलेल्या आरोपानंतर महापालिकेने पाटील यांची एस-विभाग कार्यालयातून रुग्णालय विभागात उचलबांगडी केली; मात्र काही आठवड्यांतच त्यांना पुन्हा पश्चिम उपनगरातील के-उत्तर विभाग कार्यालयात सहाय्यक आयुक्तपदी नियुक्त केले. आता पटेल यांच्याप्रमाणे गुन्हे शाखा पाटील यांना अटक करणार का, अशा चर्चेला वेग आला आहे.
---
प्रकरण काय?
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पटेल यांनी केलेल्या आरोपांनुसार, सहाय्यक आयुक्त पाटील यांच्या सूचनेनुसार त्याने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, आयपीएस अधिकारी, शासकीय अधिकारी, सेलिब्रिटी, व्यावसायिकांकडून एकूण ८० कोटी रुपये गोळा केले. ती रक्कम पाटील यांना दिली; मात्र या गुंतवणूकदारांनी गृहप्रकल्पाबाबत पाठपुरावा सुरू करताच पाटील यांनी हात वर केले. याच वादातून पाटील, महिला उपनिरीक्षक, समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्याने चार गुंडांकरवी अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार पटेल यांनी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.