धूळमुक्त मुंबईसाठी २९ अत्याधुनिक वाहने

धूळमुक्त मुंबईसाठी २९ अत्याधुनिक वाहने
Published on

धूळमुक्त मुंबईसाठी २९ अत्याधुनिक वाहने
पहिल्या टप्प्यात पालिकेकडून २९ मशीन्सची खरेदी; ८० कोटींचा खर्च

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि रस्त्यांवरील धुळीचे साम्राज्य संपवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. मुंबईत रस्ते स्वच्छ करताना धूळ हवेत न उडता थेट शोषून घेतली जावी, यासाठी पालिका प्रशासन ७९.५ कोटी रुपये खर्च करून २९ अत्याधुनिक मेकॅनाइज्ड डस्ट-मिटिगेशन वाहने खरेदी करीत आहे. या यंत्रणेमुळे प्रदूषणाची मात्रा लक्षणीयरीत्या कमी होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
या प्रकल्पाचा भाग म्हणून पालिकेने यापूर्वी सात मशीन्स खरेदी करून एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता; मात्र अनेक सहाय्यक आयुक्तांनी या अत्याधुनिक मशीनचा वापर करण्यास नकार दिला; मात्र झाडलोट करताना उडणारी धूळ शोषून घेणारी यंत्रे वापरणे गरजेचे असल्याचे काहींचे मत आहे, त्यामुळेच धूळ न होता रस्ते साफ करण्यासाठी या मशीनला दुसरा पर्याय सध्या तरी उपलब्ध नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटते.
काही सहाय्यक आयुक्तांनी केलेली टाळाटाळ बाजूला सारत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र उर्वरित २९ मशीन्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी या निर्णयाला दुजोरा दिला असून, मुंबईला प्रदूषणमुक्त करायचे असेल तर मेकॅनाइज्ड स्विपिंगशिवाय दुसरा कोणताही प्रभावी पर्याय सध्यातरी पालिकेपुढे उपलब्ध नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वॉर्ड स्तरावरील अडचणींवर मात करून लवकरच या नवीन २९ मशीन्सचा ताफा मुंबईच्या सेवेत दाखल केला जाईल, अशी माहिती डॉ. ढाकणे यांनी दिली.
मुंबईत गेल्या अनेक दशकांपासून सकाळी रस्ते झाडण्याची पारंपरिक पद्धत सुरू आहे. एकाचवेळी संपूर्ण मुंबईत हजारो सफाई कामगारांकडून झाडलोट केली जात असल्याने, रस्त्यावरील सुकी धूळ मोठ्या प्रमाणावर हवेत उडते. सकाळी हवेचा वेग कमी असल्याने ही धूळ वातावरणात खालच्या थरातच तरंगत राहते, ज्यामुळे मुंबईच्या हवेतील प्रदूषणाची मात्रा अचानक वाढते, याकडेही पालिका प्रशासनाने लक्ष वेधले आहे.
​या नवीन मेकॅनाइज्ड मशीन्समध्ये व्हॅक्यूम सक्शन आणि वॉटर स्प्रिंकलर (पाण्याचे फवारे) तंत्रज्ञान असल्याने, रस्ता झाडताना धूळ हवेत उडण्यापूर्वीच ती मशीनमध्ये ओढून घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांत सात वाहने पालिकेत दाखल झाली असून पुढील नऊ महिन्यांत उर्वरित २२ वाहने पालिकेच्या ताफ्यात येतील. या वाहनांमुळे मुंबईतील पारंपरिक आणि प्रदूषणकारी झाडलोटीला चाप बसेल, असा ठाम विश्वास अतिरिक्त आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com