तलावांतील पाणीसाठा ८.६८ टक्क्यांवर

तलावांतील पाणीसाठा ८.६८ टक्क्यांवर
Published on

तलावांतील पाणीसाठा ८.६८ टक्क्यांवर
मुंबईतील जलसंकटावरून महापालिकेत रणकंदन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठा केवळ ८.६८ टक्क्यांवर आल्याने मुंबईवर भीषण जलसंकट ओढवले आहे. या गंभीर परिस्थितीवरून सोमवारी (ता. २२) महापालिका सभागृहात लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय निष्क्रियतेवर बोट ठेवत जोरदार हल्लाबोल केला. ‘वाढत्या लोकसंख्येच्या आणि इमारतींच्या प्रमाणात धरणांची क्षमता वाढवण्याचे कोणतेही ठोस काम प्रशासनाने केलेले नाही,’ असा थेट आरोप करीत नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध केला, तसेच तातडीने ‘वॉटर मास्टर प्लॅन’ लागू करण्याची मागणी केली.

​भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी मांडलेल्या प्रस्तावावर ३० हून अधिक नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. विरोधी पक्षनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासकीय ‘व्हिजन’वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘अनेक भागात उंच मजल्यांवर पाणी चढत नाही, नळ कोरडे पडत असल्याने महिलांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिका केवळ पाणी बचतीचे आवाहन करून हात वर करीत आहे,’ अशी घणाघाती टीका पेडणेकर यांनी केली. तर राष्ट्रवादीच्या सईदा खान यांनी पाण्याच्या वापराचे ऑडिट करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी या वेळी केली. सभागृहात नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत, बागांना पाणी देणे, रस्ते धुणे आणि गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा होणारा अपव्यय तातडीने थांबवण्याची मागणी केली. भाजप नगरसेविका रीटा मकवाना यांनी, शहरातील हजारो बंद बोअरवेलचे ऑडिट करून, त्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरण्याचा पर्याय सुचवला.

ऑगस्टच्या मध्यापर्यंतच पाणीसाठा
तलाव क्षेत्रांत गेल्या २४ तासांत अजिबात पाऊस झालेला नाही. सध्या तलावांत केवळ १.२५ लाख दशलक्ष लिटर साठा असून, तो फक्त ऑगस्टच्या मध्यापर्यंतच पुरू शकतो. गेल्या वर्षी याच दिवशी साठा २५.८७ टक्के होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना केल्या जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सभागृहात स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com